नागपूर: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आंदोलनातील ओबीसींच्या सहभागावरून केलेल्या विधानाचे अजूनही पडसाद उमटताना दिसत आहेत. आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांचं हे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचं सांगत आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल अत्यंत निंदनीय वक्तव्य केलं. समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हे वक्तव्य आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत मी मध्यस्थी याचिका दाखल केली आहे. येत्या 19 तारखेला या मध्यस्थी याचिकेवर सुनावणी होणार आहेय सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी आशा आहे. दोन वर्षे राज्य सरकारने टाईमपास केला आहे. धनदांडग्या लोकांना ओबीसी समाजाच्या जागांवर निवडणूक लढवण्याचा राज्य सरकारचा कट आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक चुकीचा अध्यादेश काढला असून या अध्यादेशात एक हजार चूका आहेत, असं ते म्हणाले.
नागपूर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का? पालकमंत्र्यांचं अस्तित्व कुठे आहे?, असा सवाल करतानाच पालकमंत्र्यांपासून नागपूर जिल्हा वंचित आहेत, याकडे त्यांनी लक्ष द्यावं. मी पालमंत्री असताना डीपीडीसीतले सर्व पैसे खर्च व्हायचे. नागपूरात आता समाजकल्याणच्या कामात गैरप्रकार होत आहे. निधीचं समान वाटप झालं नाही तर न्यायालयात जावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समाज योगदानाबाबत नोंद घ्यावी असं पत्र पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवू, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Coronavirus: बाजार ते लग्न… गर्दीत जाणं टाळा; महापौर किशोरी पेडणेकरांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन
एक गोळी कोरोनावर गुणकारी, पाच दिवसांचा कोर्स 1399 रुपयांमध्ये; नवी गोळी मार्केटमध्ये दाखल