नागपूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं, असं थोरात म्हणाले होते. काँग्रेसचे दुसरे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थोरात यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. बाळासाहेबांची भूमिका योग्यच आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. (ncp should merge in congress, vijay wadettiwar agree with balasaheb thorat statement)
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचं समर्थन केलं. खरंतर सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे आपण आपसात मतभेद ठेवण्यापेक्षा, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि एकमेकांना दुखावण्यापेक्षा एकमेकांच्याविरोधात बोलण्यापेक्षा एकत्रं आलं पाहिजे. आपण एकाच विचारधारेचे आहोत. अशावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी ही भूमिका योग्यच आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसींच्या हक्काचं आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. राज्यातील ओबीसी जागृत आहे. ओबीसींच्या जागेवर इतरांना उभं करणं सर्वच पक्षाला महागात पडणार आहे. त्यामुळे उद्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची वेळ आली तर सर्वच पक्ष ओबीसींच्या आधीच्या आरक्षित जागेवर उमेदवार देणार आहेत. तसं सर्वच पक्षाने जाहीरही केलं आहे. आमच्या पक्षाचीही तीच भूमिका आहे. पुढील जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होईल. ओबीसी विरुद्ध खुला वर्ग अशी निवडणूक होणार नाही. सगळ्यांना त्या प्रक्रियेतून जावं लागेल, ते करावंच लागेल. त्यातच त्यांचं भलं आहे. कारण राज्यातील ओबीसी जागृत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची जी चर्चा होत आहे. ती केवळ पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. पाच जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ज्या 87 जागा रिक्त झाल्या होत्या त्यावर निवडणूक आयोगाने पत्रं पाठवून सद्यस्थितीची माहिती मागवली आहे. मागच्यावेळीही अशी माहिती मागवली होती. त्यावेळी कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. तेव्हा आयोग आणि कोर्टाला आम्ही तशी विनंती केली होती. आज जरी निवडणूक आयोगाने पत्रं पाठवलं असलं तरी निवडणूक प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालवधी लागतो. सप्टेंबर अखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ माहिती देतील. पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये हे सर्वांचं मत आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. मुख्यमंत्री गरज पडल्यास आणखी बैठक घेतील. त्यात सर्वंकष चर्चा करून निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही सर्व मिळून रणनीती ठरवणार आहोत. विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतलं जाईल. ओबीसींना आरक्षण मिळावं यावर सर्वांचं एकमत असल्याने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं उचित राहील. कोण काय म्हणालं या पेक्षा सरकारच्या अधिकारात काय येते त्यानुसार निर्णय घेतला जाईल. जे जे पर्याय समोर आहे, त्याचा वापर करून ज्यातून रिलिफ मिळेल तो वापरून ओबीसी आरक्षण वाचवू, असंही त्यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये ही आमच्या पक्षाचीही भूमिका आहे. याबाबत आम्ही दोन तीन ॲाप्शनवर काम करू. कोर्टाचाही पर्याय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (ncp should merge in congress, vijay wadettiwar agree with balasaheb thorat statement)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 13 September 2021 https://t.co/rcDScOKSPv #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन
ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार, केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा; नाना पटोले यांची मागणी
(ncp should merge in congress, vijay wadettiwar agree with balasaheb thorat statement)