नागपूर : गेल्या चोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. चाचण्यांपैकी पाच टक्के पॉझिटिव्ह येत आहेत. तर एकाच दिवशी अकरा ओमिक्रॉनबाधित सापडल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे.
बुधवारी जिल्ह्यात तब्बल 404 नव्या बाधितांची भर पडली. मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्येतील वाढ ही दुपटीहून अधिक आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना जिल्ह्यात ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढत होती, त्यापेक्षा ही तीव्र गतीने सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळं प्रशासनालाही पुन्हा निर्बंध कठोर करण्याची वेळ आली आहे. इयत्ता एक ते आठवीच्या सुरू करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यात मंगळवारला 196 बाधितांची भर पडली होती. त्यात बुधवारी दुपटीहून अधिकने वाढ होत ती संख्या तब्बल 404 वर पोहोचली आहे.
यापूर्वी जिल्ह्यात दुसर्या लाटेदरम्यान म्हणजेच 27 मे 2021 रोजी 476 बाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतरही बुधवारी नोंदविल्या गेलेली रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. बुधवारी शहरात 5221 व ग्रामीणमध्ये 2886 अशा जिल्ह्यात 8 हजार 107 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी शहरातून 329, ग्रामीणमधून 49 व जिल्ह्याबाहेरील 26 अशा 404 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. दिवसभरात शहरातून 19 व जिल्ह्याबाहेरील 5 असे केवळ 24 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी आणखी 11 नव्या ओमिक्रॉन बाधितांची भर पडली आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. यापैकी काही रुग्ण हे ठणठणीत होऊन आपल्या घरीही परतले आहे. बुधवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून जिल्ह्यातील 11 रुग्णांचे अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये युएसएवरून रिटर्न आलेल्या 32 व 22 वर्षीय तरुणांसह हनुमाननगर झोन परिसरातील एकाच कुटुंबातील एका 37 वर्षीय महिला व 72 वर्षीय पुरुष, याशिवाय 24, 27 वर्षीय तरुण, 58, 43 व 59 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिलेचा पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाले आहेत. या अकराही जणांना ओमिक्रान या नव्या व्हेरियंटची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही रुग्णांची विदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यात शहरातील एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. मुलगा आणि सून हे यूएसएवरून परतले आहेत. दोघांनाही बाधा झाली आहे. तर त्यांच्या घरातील दोन नोकरांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, काहींची विदेश प्रवासाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. त्यांना लक्षणे असल्यानं ओमिक्रॉन संशयित म्हणून त्यांचे नमुने जणुकीय चाचणीकरिता प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्यांचा अहवाल सकारात्मक आढळला. यापैकी 43 वर्षीय पुरुष हे एक खासगी डॉक्टर असल्याचे सांगण्यात येते. यातील बहुतांशी रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतलेत.