मुंबई : हिवाळी अधिवेशन सूरू असून सभागृहात आज १९९३ च्या बॉम्बस्फोटावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा नाचतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका करताना सुधाकर बडगुजर यांचं नाव घेतलं आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही टीका करत चौकशी करण्याची मागणी केली होती.
सुधाकर बडगुजर यांच्या व्हीडीओवरून भाजप आमदार नितेश राणे मंत्री दादा भुसे, आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना चौकशीची मागणी केली. आरोपी सलीम हा पेरोलवरती असताना पार्टी करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. यावर बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सुधाकर बडगुजर हे नाशिकचे महानगर प्रमुख म्हणून काम पाहतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द वापरले म्हणून राज्यात त्यांच्यावर सुधाकर बडगुजर यांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. सुधाकर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.