नागपूर : वेस्ट लँडवर होणारे अनेक प्रयोग मी जिद्दीने करतो. प्रेमाने करतो. नाही तर ठोकून करतो. मी लोकांनाही सांगून टाकलं. पुष्कळ झालं. लोकांनो तुम्हाला पटलं तर मतदान करा. नाही नका करू मतदान. आता मी लोणी लावायला तयार नाही. मला पुष्कळ कामे करायची आहेत, असं बिनधास्त आणि रोखठोक मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपुरात वनराई फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
ग्रामीण भारताचे चित्र बदलविण्यासाठी जलसंवर्धनापासून वेस्टलॅन्डपर्यंतचे प्रयोग मी जिद्दीने करत असतो. वेस्ट लँडवर होणारे अनेक प्रयोग मी प्रेमाने करतो, नाहीतर ठोकून करतो. मी आता लोकांना पण सांगितलं की, तुम्हाला पटलं तर मत द्या, नाहीतर देऊ नका. मी आता फार लोणी लावत नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, नाहीतर कोणी नवीन येईल. कारण मला या कामात आता जास्त वेळ द्यायचा आहे. यामुळे भविष्य बदलू शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले.
अनेक चांगल्या गोष्टी लोक समजून घेत नाही असं म्हणण्यापेक्षा आपण समजून देण्यात कमी पडतो असं मला वाटतं. कारण पर्यावरणाचा विषय लोकांपर्यत अजून पाहिजे तसा पोहोचला नाही. मी नागपुरात प्रत्येक वॉर्डात पाच झाडे लावण्यास सांगितलं. एक संत्र्यांचं झाड लावलं पाहिजे. पण लोक नाही करत. माझ्या घरासमोर पाच झाडं लावली. माझा नातू रोज पाणी टाकतो. आमचे नगरसेवक आहेत. हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांना झाडांना पाणी टाकायला सांगतो. पण कोणी पाणी टाकत नाही. एनआयटीने पाणी दिलं आहे. पण टाकलं जात नाही. त्यामुळे माझ्या एका मित्रा सोबत मिळून आम्ही आता टँकरने झाडाला पाणी देण्याचं काम सुरू करत आहोत, असं गडकरी यांनी सांगितलं.
पाण्यातून हायड्रोजन निघेल असं मी सांगत होतो. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. कुणाचा विश्वास बसत नव्हता. माझ्या घरच्यांचाही विश्वास बसत नव्हता. मग मी विक्रम किर्लोस्कर यांना फोन केला आणि हायड्रोजनवर चालणारी गाडी मागितली. ते म्हणाले, आपल्याकडे गाडी नाहीये. जपानमध्ये आहे. मी म्हणालो, जपानहून मागवं. माझ्या दारात उद्या गाडी पाहिजे. कारण मी लोकांना पाण्यातून हायड्रोजन निघेल असं सांगतो आणि लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून गाडी पाहिजे. ती गाडी आली. मी त्या गाडीने फिरतो. संसदेत जातो. लोक म्हणतात हायड्रोजनवर चालणारी गाडी आली. आता लोक माझ्यासोबत सेल्फीही काढतात, असा किस्साही त्यांनी सांगितलं.
पाण्याने इकॉनॉमी बदलेल असं माझं मत आहे. मी इथेनॉलबद्दल बोलायचो. तेव्हा अडवाणी म्हणायचे इथेनॉलने काय होणार आहे? मी म्हणायचो देश बदलेल. तेव्हा मी फक्त एकटा बोलायचो. आता इतरही बोलत आहेत, असं सांगतानाच माशेलकरांनी देशाचं नाव जागतिक स्तरावर नेलं. मी आता बंगलोरमध्ये आकाशातून चालणारी डबल डेकर बस आणण्याचा प्रयत्न करत आहे. काहीच अशक्य नाही. काहीही होऊ शकतं. मी एक टनेल बघून आलो. जोजिला येथे.
मी तिथे गेलो. तेव्हा उभं राहू शकत नव्हतो. मायनस 8 डिग्री तापमान होतं. आम्ही तिथे कुडकुडत होतो. त्यांना सांगितलं हे टनेल 2024पर्यंत पूर्ण करा. ते ऐकायला तयार नव्हते. मी म्हटलं निवडणुका आहेत. काहीही करा. करा किंवा मरा, पण टनेल 2024पर्यंत पूर्ण हवंच. आता कळलं ते 70 टक्के पूर्ण झालं आहे. इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं, असंही ते म्हणाले.