नागपूर : आम्ही एनडीएत होतो. मोदी पंतप्रधान होते. तेव्हा भाजपच्या एकाही मंत्र्यांना काम करण्याचा अधिकार नव्हता. नितीन गडकरी यांना काही काम सांगितलं तर ते करायचे. त्यांच्याकडे मी जिल्ह्याचं एक काम घेऊन गेलो होतो. पाच सहा महिन्यानंतर परत लोकसभेत विचारलं कामाचं काय झालं? काम सुरू झालं नव्हतं. त्यावर गडकरी यांचं एक वाक्य होतं. ते मी बोलू शकत नाही. इतकं त्यांना भाजपमध्ये साईड लाईन केलं होतं. गडकरींना साईडलाईन करून आमच्या मराठवाड्याचं नुकसान करण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते. खैरे यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार आम्ही शिवसंवाद यात्रा करत आहोत. मी गडचिरोलीचा दौरा करणार आहे. गडचिरोलीशी माझा चांगला परिचय आहे. महाराष्ट्रात आज वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने राज्यात वेगळी पद्धत सुरू केली आहे. त्यांच्यात आमचे 40 गद्दार सहभागी झाले आणि आपली चूल पेटवली. घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले.
ते आनंद दिघे साहेबांचं नाव घेतात. मात्र दिघे साहेबां सोबत मी स्वतः काम केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली हे कोणत्याही शिवसैनिकला आवडलं नाही. उद्धवजींना धोका दिला. आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललं जातं आहे. त्यामुळेच आता आम्ही ग्राऊंडवर जाऊन या गद्दारांची माहिती देत आहोत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
खोक्यांचं राजकारण आहे. 50-50 खोके घेऊन राजकारण केलं. कुठे कुठे गेले. सर्वोच्च न्यायालयात गेले. निवडणूक आयोगाने दगा दिला. दबावाखाली आयोगाने निकाल दिला. केंद्राच्या दबावाखाली निकाल दिला.केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेना चिन्हाचा निर्णय झाला. असं दबावाचं राजकारण मी एवढ्या वर्षात पाहिलं नाही, असं खैरे म्हणाले.
बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना उभी केली ती गद्दारानी शिवसेना फोडली. उद्धवजींच्या बाजूने सर्वधर्मीय जनता आहे. सुप्रीम कोर्टात उद्धवजींचा विजय होऊ दे ही प्रार्थना टेकडी गणेशला करणार आहे. निर्णय आमच्या बाजूने येऊ द्या. मग बघा काय होतं यांचं. आता आम्ही थांबणार नाही. आता शिवगर्जना करणार, असं त्यांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलता येत नाही. आम्ही लाचार नाही की ओवैसींना जाऊन भेटू. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. बावनकुळे यांनी थोडं सांभाळून बोलाव. विनाकारण काही बोलू नये, असं ते म्हणाले. मुस्लिम समाज आमच्याकडे वळायला लागला. वंचित आमच्याकडे वळत आहे. त्यामुळे भाजप त्यात भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री राजकारण करतात. विरोधकांची कामे केली जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला.