गजानन उमाटे, नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) आणि 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. धमकीमागे कर्नाटक कनेक्शन असल्याचं उघड झालंय. मात्र कर्नाटकातून फोन करणाऱ्या आरोपीचा यामागे नेमका काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात एका महिलेलाही कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता ज्या व्यक्तीने नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन केले होते, त्या संशयित आरोपी जयेश पुजारा नामक व्यक्तीला महाराष्ट्रात आणलं जाण्याची तयारी सुरु आहे. बेळगावच्या जेलमधून जयेश पुजाराने गडकरी यांच्या कार्यालयात फोन केल्याचं पोलीस तपासा उघड झालंय. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टीव्ही 9 मराठीशी याविषयावर संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिलेले फोन आणि सीमकार्ड जप्त बेळगाव येथून जप्त करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यातील धमकी आणि दोन दिवसांपूर्वी दिलेल्या धमकीचे फोन- सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. बेळगाव जेलमधून आरोपी जयेश पुजारा याच्याकडून दोन मोबाईल, दोन सीम कार्ड जप्त केले असून त्यातील रेकॉर्डस तपासले जात आहेत. काल नागपूर पोलीस कर्नाटकात दाखल झाले. त्यांनी बेळगाव जेलची पूर्ण झाडाझडती घेतली. तसेच फोन केलेली व्यक्ती जयेश पुजारा याचा जबाबदेखील नोंदवण्यात आलाय. आता जयेश पुजाराला नागपुरात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नितीन गडकरी यांच्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा धागा काल समोर आला. जयेश पुजारा याने खंडणीसाठी जो नंबर दिला होता, ते रझिया नावाच्या एका मुलीचा असल्याचे उघड झाले आहे. पोलिस तपासानुसार, रझिया गेल्या काही दिवसांपासून मंगळुरू येथील रुग्णालयात अॅडमिट आहे. तर तिचा मित्र बेळगावच्या जेलमध्ये आहे. तिच्या मित्राकडूनच जयेश पुजारा याने रझियाचा नंबर घेतला आणि धमकी देण्यासाठी त्या नंबरचा वापर केला. हा नंबर देण्यापूर्वी जयेश पुजारा याने रझियालाही फोन केल्याचं तिच्या जबाबात नमूद आहे. एका महत्त्वाच्या कामासाठी तुझा नंबर देतोय, असं जयेश पुजाराने म्हटल्याचं रझियाने सांगितलंय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जानेवारी महिन्यातदेखील एकदा धमकीचा कॉल आला होता. त्यावेळीदेखील फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारा हेच नाव सांगितलं होतं. बेळगाव जेलमधूनच तो फोन आला होता. त्यामुळे आता या व्यक्तीला नागपुरात आणून त्याची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.