नागपूर : नागपुरात विद्यार्थ्यांचे कडाक्याच्या उन्हात आंदोलन (Andolan) सुरू आहे. आंदोलनादरम्यान 70 मुलांचं उपोषण सुरू आहे. यात देशभरातील मुला-मुलीचा समावेश आहे. नागपूर मनपाकडून ना पाण्याची सोय, ना स्वच्छतागृहाची सोय करून देण्यात आली. रोज सकाळी मुलींना स्वच्छतागृहांचा शोध घ्यावा लागतो. ही व्यथा आहे नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करणाऱ्या देशभरातील 165 विद्यार्थ्यांची. देशाच्या अर्धसैनिक दलात (paramilitary party ) त्यांची निवड झाली. पण कोरोनामुळे प्रक्रिया लांबली. आता या विद्यार्थ्यांना नोकरीत घेतलं जात नाही. नागपुरातील संविधान चौकात (Sanvidhan Chowk) देशभरातील 165 विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आमरण उपोषणामुळे यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली. आम्ही बातमी कव्हर करतानाच, एका उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला उचलून रुग्णालयात न्यावं लागलं.
विदर्भात 40 पेक्षा जास्त तापमान, त्यात ही तरुण मुलं- मुली आंदोलन करतात. रात्र झाली की रोडवर झोपायचं. सकाळ झाली की परिसरातील टॅायलेटचा शोध घ्यायचा. काहींचं उपोषण काहींचं मिळेल ते खायचं. आपल्या हक्कासाठी लढा द्यायचा. दीड महिन्यात केंद्र सरकारने या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. ज्या नागपूर शहरात तरुण मुली रस्त्यावर आंदोलन करत आहेत, त्यांच्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं साधं पाणी आणि फिरत्या स्वच्छतागृहाची सोयंही केली नाही. ही व्यथा आहे या आंदोलनाची.
नोकरीसाठी पात्रता परीक्षा झाली. आता निवड होणार. आपण पोस्टिंगवर जाणार, अशी स्वप्न ही मुलं पाहत आहेत. पण, सुरुवातीला कोरोनामुळं निवड झाली नाही. असं त्यांना सांगण्यात आलं. आता केंद्र सरकारनं त्यांच्या या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. हे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहेत. पण, ते आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल मनपानं घेतली नाही. त्यामुळं आंदोलकांची चांगलीच गैरसोय होते.