नागपूर : भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना नागपूर महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोनाबाधित असताना गृह विलगीकरणाचे नियम मोडले म्हणून ही नोटीस बजावली. कोविड नियम तोडले म्हणून कारवाई का करण्यात येऊ नये?, असे या नोटिसीत म्हटले आहे. तसेच चोवीस तासांत उत्तर सादर करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांनी आमदार खोपडे यांना दिले आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनी मनपाला नोटिसीचं उत्तर दिलं. संबंधित अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून बाहेर पडल्याचं खोपडेंचं स्पष्टीकरण आहे. गैरसमजीतून प्रकार घडला. त्यामुळे नोटिसीचा फेरविचार करण्याची विनंती आमदार खोपडे यांनी महापालिकेला केली आहे.
आमदार कृष्णा खोपडे यांनी मी पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर टाकले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी ते घराबाहेर पडले. नाना पटोले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं. त्या आंदोलनात आमदार खोपडे सहभागी झाले होते. त्यामुळं त्यांनी गृहविलगीकरणाचे नियम मोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
तेरा जानेवारीला आपण कोविड संक्रमित होतात. त्यामुळं एकोणवीस जानेवारीपर्यंत गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक होते. पण, अठरा जानेवारीला आपण घराबाहेर पडलात. कोविड निर्बंधांचे पालन केलेले नाही. त्यामुळे आपल्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये. चोवीस तासांत उत्तर देण्यात यावे, असं पत्र मनपा अधिकाऱ्यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना पाठविलंय.
मी पॉझिटिव्ह असलो तरी कोणत्याही प्रकारची लक्षणं नव्हती. सर्दी, खोकला, ताप काहीच नव्हता. आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मी घराबाहेर पडलो. नोटिसीचा सन्मान करून घराबाहेर पडणारा नागरिक आहे. गैरसमजुतीतून हा प्रकार झाला. त्यामुळं नोटिसीवर फेरविचार करून निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार खोपडे यांनी मनपाला केली आहे.