नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) पुण्यतिथी तथा अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) जयंती आहे. यानिमित्ताने 75 अधिकारी 75 शाळांना भेटी देवून घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत. या संदर्भातील आदेश प्रशासनाने जाहीर केले. स्वराज्यासाठी बाणेदार नेतृत्व म्हणून लोकमान्य टिळक यांचे स्मरण केले जाते. तर सामाजिक सुधारणावादी अण्णाभाऊ साठे सामाजिक सुधारणांसाठी ओळखले जातात. या दोन महापुरुषांना अभिवादन करताना जिल्ह्यातील शाळांमध्ये एकाच वेळी एकाच सुरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व विशद केले जाणार आहे. ज्या ठिकाणी अधिकारी नसतील त्या ठिकाणी देखील शाळा स्तरावर कार्यक्रम होणार आहे. स्वतः जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) केंद्रीय विद्या वायुसेना तेलंगखेडी, वायूसेना नगर सेमिनरी हिल्स येथे संबोधन करणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा परिषद हायस्कूल, काटोल रोड, नागपूर येथे संबोधन करणार आहेत. यासोबतच उपायुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व इतर शासकीय अधिकारी असे एकूण 73 अधिकारी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये संबोधन करणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल काय आहे. तिरंगा डौलाने फडकणे म्हणजे काय ? त्यासाठी केलेला त्याग व त्यामागचा इतिहास कळावा. यासाठी हर घर तिरंगा, स्वराज्य महोत्सव, यासंदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकणार आहे. त्यामुळे हा तिरंगा लावायचा कसा, यासोबतच हा तिरंगा घराघरावर लावण्याचे भाग्य प्राप्त कोणामुळे झाले. स्वातंत्र्याचा लढा काय होता, त्यासाठी कोणी बलिदान दिले. संविधानाचे महत्व अशा अनेक प्रश्नांना येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये पुढील काळात ‘हर घर तिरंगा’ संदर्भातील चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली जाईल. तसेच सर्व अधिकारी एकच संदेश विद्यार्थ्यांना देणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने या संदर्भात तयार केलेल्या चित्रफितीचे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्रदर्शन होणार आहे.
घरामध्ये तिरंगा उभारताना तो अतिशय सन्मानाने व ध्वज संहितेचे पालन करून उभारले गेला पाहिजे. यासाठी 1 ऑगस्टपासून ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला झेंडा उभारण्यासाठी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता महापालिका संपूर्ण नागपूर शहरात आपल्या झोन ऑफिसमध्ये तिरंग्याची उपलब्धता करून देणार आहे. तर प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये तिरंगा उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायती आहेत. त्या कार्यालयात देखील तिरंगा उपलब्ध असणार आहे. नागरिकांना नाममात्र शुल्क भरून हा तिरंगा मिळणार आहे. प्रत्येकाने तिरंगा स्वतः खरेदी करून लावावा अशी भूमिका आहे. जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापक तिरंगा पुरविणार आहे. याशिवाय 11 ऑगस्टला अमृत महोत्सवी रक्षाबंधन, 12 ते 14 ऑगस्टला निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.