नागपूर : नागपूर जिल्ह्यात रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करा. असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत टास्क फोर्समधील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांची मते पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. नागपूरमध्ये सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग, त्याची व्याप्ती आणि प्रसार वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर यावेळी चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी मेयो, मेडिकल, एम्सला भेट देऊन आणीबाणीच्या परिस्थितीत नागपूर शहरात उपलब्ध असणारे बेड, ऑक्सिजनचा साठा, औषधांचा साठा, वैद्यकीय मनुष्यबळ याचा आढावा घेतला असल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र स्वयंशिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळत प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी या बैठकीत केले. येणाऱ्या काळात राज्य शासनामार्फतही काही निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेने पूर्ण तयारीनिशी कोरोना लाट वाढणार नाही, यासाठी तयार राहावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे निर्णय बैठकीत जाहीर केले. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
कोविड रुग्ण वाढत असल्यामुळे वर्ग 1 ते 8 पर्यंतच्या नागपूर महानगर (खासगी व शासकीय ) तसेच शहरालगतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दंडात्मक कारवाईचा निर्णय अधिक प्रभावी करणार, मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रुपये दंड. शाळा, महाविद्यालये, दुकाने, खासगी व सरकारी कार्यालयातील आस्थापनावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगारांना दोन लसीच्या मात्रा घेणे अनिवार्य. प्रमुखांनी याची खातरजमा करावी. खासगी, सार्वजनिक वाहनात प्रवास करताना मास्क अनिवार्य. अन्यथा दंडात्मक कारवाई करणार. प्रवास करताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अत्यावश्यक असेल. शहरात मनपातर्फे ही मोहीम अधिक सक्रिय करणार. सर्व नियंत्रण कक्ष सुरू करणार. तालुक्यापासून शहरातील सर्व नियंत्रण कक्षांना सक्रिय करणार. यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाईल. माध्यमांनी याला प्रसिध्दी द्यावी. सुपरस्प्रेडरचे लसीकरण झाले याची खातरजमा करणे, त्यांची चाचणी करणे, मास्क वापरण्याची सक्ती करणे, याबाबत मनपामार्फत कारवाई गतीशील केली जाईल. मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टारंट यांच्याकडून वारंवार नियमाची पायमल्ली होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे, दंड वसुलीचे अधिकार पोलिसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.