नागपूर : ओमिक्रॉनची भीती शहरात कायम आहे. आज सकाळी शारजहावरून विमान नागपूर विमानतळावर पोहचले. त्यानंतर लगेच प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना मनपानं आमदार निवासात विलगीकरणात पाठविलं. काही प्रवाशांना मात्र, घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला.
ओमिक्रॉनसोबत लढण्यासाठी नागपूर महापालिका पूर्णपणे तयार झालेली आहे. नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर पहिलं शारजहा येथून आलेलं विमान उतरलं. या विमानात 99 प्रवाशांसह क्रू मेंबरची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांना घरी पाठवून विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. तर त्यापैकी काही प्रवाशांना नागपूरमधील विलगीकरण सेंटरला पाठवण्यात आले.
बहुतांश प्रवाशांना एअरपोर्टवरून नागपूरच्या आमदार निवासात पाठविण्यात आलंय. महापालिकेच्या बस या विमानतळावर सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. शारजहावरून नागपूरला आलेल्या प्रवाशांची संख्या क्रू मेम्बरसह 104 आहे.
राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार शहरात दाखल होणार्या विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असणार्या प्रवाशांविषयीची नियमावली राबविली जात आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या बेड्स, औषध आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबतचा महापौरांनी आढावा घेतला. पुरेसा औषधसाठासुद्धा उपलब्ध आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णसंख्या 50 टक्केपर्यंत आल्यास मनपामध्ये आरोग्य कर्मचारी संख्यासुद्धा वाढविण्यात येईल, अशी माहिती डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विद्यापीठात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचा आढावासुद्धा महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला होता. सध्या रुग्णसंख्या कमी असली, तरी आरोग्य सुविधा तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे आरोग्य यंत्रणा पालन करत आहे.