नागपूर : मोबाईल (Mobile) आता जीवनाचा अविभाज्य अंग झालाय. मोबाईलशिवाय राहणं अनेकांना कठीण आहे. अशा परिस्थितीत मोबाईल हरवला तर त्याच मोठं दुःख असतं. सोबतच हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेलच, याची शास्वती फारच कमी असते. मात्र अशा परिस्थितीत आपला हरवलेला मोबाईल मिळाला तर खुशीला पारावार राहत नाही. असंच काही सीताबर्डी (Sitabardi) पोलीस स्टेशनमध्ये घडलं. पोलिसांनी हरविलेले आणि चोरी गेलेले 70 मोबाईल शोधून काढले. आणि त्यावर कागदी कारवाई करत सगळे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केलेत. यावेळी मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता, असे एसीपी नीलेश पारवे यांनी सांगितलं. हा सगळा पोलिसांचा उपक्रम बघून मूळ मालकांच्या चेहऱ्यावर हसू खिळलं. सोबतच पोलिसांबद्दल (Police) विश्वास वाढला.
आयएमआय नंबरवरून मोबाईल स्ट्रेस केले जातात. मोबाईल मिसिंग आहेत की चोरी झाले आहेत, याची शहानिशा केली जाते. साडेतीन ते चार लाख रुपयांचा मुद्देमाल परत करत आहोत. काही नागरिकांनी मोबाईल परत मिळेल की नाही, याची आशा सोडली होती. त्यांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आलेत, अशी माहिती नीलेश पारवे यांनी दिली.
दुसऱ्या एका घटनेत, नागपुरातील सेमीनरी हिल्स येथील त्रिलोकचंद भाईचंद कुमरे हे सीजीएसटी अँड सेंट्रल एक्साईज येथे अधीक्षक आहेत. त्यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजाकरिता गाड्यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी प्रिंसीपल कमिश्नर यांच्या आदेशानुसार वीस डिसेंबर 2021 रोजी निविदा मागविल्या. 29 डिसेंबर रोजी मे. जय श्रद्धा माँ टुर्स अँड ट्रॅव्हल्सधारक आरोपीने निविदा मिळविण्याकरिता प्रयत्न केले. युनियन बँक ऑफ इंडिया, गोकूलपेठ शाखा बँकेच्या खात्यातील वितरणात फेरफार केली. निविदा प्राप्त करण्याकरिता बनावट कागदपत्रे तयार केली. हे कागदपत्र जी.ई.एम. पोर्टलवर अपलोड केले. आरोपीने निविदा प्राप्त करण्याकरिता फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे कागदपत्रे तयार केले. ते खरे असल्याचे भासवून कार्यालयाची दिशाभूल केली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.