नागपूर : सेवानिवृत्तीनंतर काय करायचं असा प्रश्न बहुतेकांना पडतो. पण, काही जण स्वतःला व्यस्त ठेवतात. त्यामुळे त्यांची प्रकृतीही बरी असते. वयाच्या साठीनंतर अशोक तेवानी यांनी स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी नियोजन केलं. त्यांनी छंद जोपासला. आता त्यांच्या या छंदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. छंद माणसाच्या जीवनात अनेक असतात. मात्र त्याचा उपयोग पशु पक्ष्यांसाठी झाला तर किती छान. नागपुरातील 72 वर्षीय एक वृद्ध लग्नाच्या पत्रिकांपासून चक्क पक्ष्यांसाठी घरटे बनवतात. आपल्या छंदातून पक्ष्यांचे रक्षण करतात.
तुमच्या घरी दरवर्षी किमान २०ते २५ निमंत्रण पत्रिका जरूर येत असतील. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या पत्रिका एकतर रद्दीत फेकल्या जातात किंवा जाळल्या जातात. परंतु या पत्रिकांचा योग्य उपयोग केल्यास त्यापासून विविध वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते. हे लक्षात आल्यानंतर नागपूरच्या ७२ वर्षीय अशोक तेवानी यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
अशोक तेवानी यांनी विविध निमंत्रण पत्रिकांच्या माध्यमातून पक्ष्यांसाठी आकर्षक आणि सुबक घरटे तयार केले आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ते पक्ष्यांसाठी घरटे तयार करण्याचे काम करतात. त्यांनी आजवर २ हजार १०० घरटे तयार केले आहेत. आता परिसरात लोकं देखील रोज त्यांच्या घरी पत्रिकांचे गठ्ठे आणून देऊ लागले आहेत. असे अशोक तेवानी यांनी सांगितले.
पशुपक्ष्यांसाठी आपण काहीतरी करावं म्हणून त्यांनी चिमणी पाखरांसाठीचं घरकुल तयार करण्याचे काम सुरू केले. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर दिवसभराचा वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न अनेकांना सतावतो. परंतु अशोक तेवानी यांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन आधीचं तयार करून ठेवला होता. त्यानुसार त्यांनी दिवसभरातील पाच ते सात तास काम करून रोज एक ते दोन घरटे तयार करतात.
या त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वजण माणसांसाठी काहीतरी करत असताना. फारच कमी जण पक्ष्यांसाठी काम करतात. त्यांच्यासाठी घरटे तयार करून देतात. यामुळे अशोक तेवानी हे नागपुरात प्रकाश झोतात आले आहेत. सेवानिवृत्तीनंतर काय करायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अशोक तेवानी असे म्हणता येईल.