नागपूर : लग्न जुळवण्यासाठी असलेल्या संकेतस्थळावर बरीच तरुण तरुणी हे आपली संपूर्ण माहिती अपलोड करतात. त्यानंतर काही तरुणींची फसवणूक झालेले उदाहरण आपण पाहिलेले आहे. नागपूरमध्येही गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असाच एक प्रकार उघड झालेला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सत्य समोर आल्यानंतर तरुणीने गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
रेल्वेत लोको पायलट असल्याचं सांगत लग्न जुळवण्यासाठी असलेल्या साईडवरून तरुणीशी ओळख केली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. पाच लाख रुपयांचा गंडा घातला. पोलिसांनी मध्यप्रदेशमधील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
आकाश अनिल जाधव असे आरोपीचे नाव आहे. तो भोपाळ येथील रहिवासी आहे. पीडित तरुणीनं लग्नासाठी आपली संपूर्ण माहिती एका विवाह संकेतस्थळावरती अपलोड केली. त्यानंतर भोपाळ येथील रहिवासी असलेला अनिल आकाश जाधव यांनी तरुणीशी संपर्क साधला.
त्यानंतर तरुणीच्या घरी जाऊन भेटही घेतली. पीडित तरुणी आणि आरोपी यांचे अनेकदा हॉटेलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आरोपीने आपण लोको पायलेट असल्याचे सांगितलं. नागपूर येथे बदली करण्यासाठी पैसे लागतील, असं तरुणीला सांगितलं.
त्यासाठी तिच्याकडून अनेकदा पैसे घेतले, असे एकूण पाच लाख रुपये पीडित तरुणीकडून घेतलेले आहे. पीडित तरुणी ही एक हॉस्पिटलमध्ये काम करते. आई वडील आजारी आहे. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिच्या दोन बहिणी काम करून घर चालवतात.
बदली करून घेण्याची वेळ संपल्यानंतर पीडित तरुणीने आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. बदली न केल्यावर तिला संशय आला. तिने चौकशी केली. त्यानंतर आरोपीचे लग्न झाले असल्याचे तिला समजले.
त्यानंतर तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी सांगितलं.
लग्नाच्या नावावर अनेकदा फसवणूक झाल्याच्या बाबी उघड झाल्यात. असं असतानासुद्धा अशा लोकांवर विश्वास कसा ठेवला जातो हा मोठा प्रश्न आहे.