गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर, ६ सप्टेंबर २०२३ : नागपूर पोलीस, नागपूर मनपा आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेश भट सभागृहात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी बोलावण्यात आले होते. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी लागणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनात गेली. त्यानंतर मागच्या वर्षी गणेश उत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली होती. आता नागपूर मनपाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्त्वात ऑनलाईन परवानगी मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन फार्म कसा भरायचा याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गणेश मंडळांनी मतदार यादीतील संख्या कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. याशिवाय राज्य सरकार यंदा उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीस देणार आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बक्षिसांची संख्या आणि रक्कम याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नागपुरात घरबसल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी मिळणार आहे. मंडळांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन नोंदणी सुरु केलीय. नागपुरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, गणेशोत्सव मंडळांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी आज मनपा प्रशासन, पोलीस विभागाने नागपुरातील सार्वजनिक गणेश मंडळांची एकत्र बैठक घेतली. यंदा गणेशोत्सवात मूर्तीदान संकल्पना राबवली जाणार आहे.
पर्यावरणाचं हित लक्षात घेता, प्रत्येक प्रभागात श्री गणेशमूर्ती दान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार पी.ओ.पी. मूर्तींवर बंदी घालण्यात आलीय. पी.ओ.पी. मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाई होणार, असंही यावेळी मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरी यांनी दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. गणेश मंडळांनी ऑनलाईन फार्म भरला जाणार असल्याने पोलिसांशी संवाद कमी होता कामा नये, असा आग्रह धरला. तसेच काही घडल्यास पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन केले. यापूर्वी काही दुर्घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय करता येईल, हेही अमितेश कुमार यांनी सांगितले.