नागपुरात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. नागपूरकरांना या पावसानं ओलचिंब केलं आहे. आज सुट्टीचा दिवस आणि गणपती बाप्पाचा (Ganapati Bappa) उत्सव सुरू आहे. त्यामुळं भक्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. सोबतच महालक्ष्मीच्या (Mahalakshmi) जेवणाचा दिवस असल्याने सायंकाळच्या वेळी महालक्ष्मी आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी (Darshan) निघणाऱ्यांसाठी हा पाऊस खोडा ठरत आहे. सकाळपासूनच पावसाने आपली हजेरी लावली. आभाळात पूर्णपणे ढग भरलेले आहेत. हवामान विभागाने सुद्धा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आज दिवसभर पाऊस असल्यानं गणपती बाप्पांच्या आणि महालक्ष्मीच्या भक्तांना पावसानं हैराण केलं. मात्र या पावसामुळे नागपुरात वाढलेल्या उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला.
भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दंडी मारली होती. शेतकरी अडचणीत आला होता. नागरिक सुद्धा गर्मीने बेहाल झाले होते. अशात आज सकाळपासून पावसाचे आगमन झाले. त्यामुळं शेतकरी सुखावला आहे. आज सकाळी जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. गोंदिया जिल्ह्यातही जवळपास अशीच काहीसी स्थिती आहे.
वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आर्वी भागात आर्वी ते वर्धमनेरी मार्गावर पुलावरून पाणी असल्यानं मार्गावरील वाहतूक प्रभावित झालीय. मागील दोन दिवसांपासून पावसानं जिल्ह्यात विश्रांती घेतली होती. आज सकाळी पुन्हा पावसाच आगमन झालं. पावसाच्या आगमनामुळे शेतीकामांना पुन्हा ब्रेक बसला आहे. सगळीकडं ज्येष्ठा गौरीच आगमन झालं असल्यानं उत्साहाच वातावरण आहे. अशात पावसानंही हजेरी लावली आहेत.