नागपूर : हवामान विभागाने विदर्भात मॉन्सून (Monsoon in Vidarbha) दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारी साडे तीन वाजतादरम्यान वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. विजाच्या कडकडाटसह जोरदार आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखवला आहे. जिल्ह्याच्या देवळी, आर्वी, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात जोरदार तर वर्धा आणि सेलू तालुक्यात मध्यम पाऊस पाऊस पडला. आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) शेतशिवार ओले झाले आहे. बळीराजा पेरणी करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत होता. आता पेरणीच्या कामाला गती मिळणार आहे. अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital) तीन तास अंधारात होता. वॉर्डातील रुग्ण अंधारात तर रुग्णालयातील परिसरात फक्त अंधार होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात अकोला, बुलढाणा, वाशिम येथून रुग्ण येतात. जोरदार वारा आणि पाऊस सुरु असल्यामुळे लाईट बंद होती. याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागला.
मॉन्सूनच्या पावसाने विदर्भात धडक दिली. बुधवारी विदर्भातील बहुतांश भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. मॉन्सूनचे आगमन अपेक्षेप्रमाणे बरसला. गारव्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली. बुधवारी सकाळपासूनच वातावरणाने कूस बदलली होती. दुपारनंतर तर आकाशात चांगलेच ढग जमायला लागले. सायंकाळी काही भागात हलका पाऊसही झाला होता. गुरुवारी सकाळपर्यंत अकोल्यात सर्वाधिक 17.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल वर्धा 16, गोंदिया 13.2, ब्रम्हपुरी 11.6 तर गडचिरोलीत 9 मिमी पाऊस नोंदविला गेला. नागपुरातही 5.2 मिमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासून ढगांची उघडझाप सुरू होती.
विदर्भात पावसामुळे तापमानात मोठी घसरण झाली. पुढचे पाच दिवस नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी त्याची तीव्रता हवी तशी नाही. चांगल्या पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणाराय. शेतकर्यांनी पेरणीची कामे सुरू करण्यापूर्वी काही काळ प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.