यवतमाळ | 23 ऑगस्ट 2023 : प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला आदर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. नातू होण्याची संधी मला मिळाली नाही. माईसाहेब आंबेडकर मला दत्तक घेण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर मी रामदास आठवले ऐवजी रामदास आंबेडकर झालो असतो, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर आहे. ते हुशार आहेत. पण कोणत्यावेळी कोणती भूमिका घ्यावी हे त्यांच्या लक्षात येत नाही. माझ्या लक्षात येतं. त्यामुळे त्यांनी मतं खाण्याचं काम करू नये, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं.
यवतमाळमध्ये आले असता रामदास आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं. अजित पवार हे युतीत आल्याने भाजपच्या मतांवर काहीच परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांना मंत्रीपद मिळाले. आम्हाला मिळाले नाही. मंत्रिपद द्यावं ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारत मंत्री पद देऊ म्हणून सांगितले होते. मात्र अजित पवार यांचा विस्तारात समावेश होईल हे मलाही माहिती नव्हतं. असं असलं तरी आरपीआयला मंत्रीपद मिळावं ही आमची मागणी कायम आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
मागच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला दोन जागा दिल्या होत्या. त्यांना कमळ चिन्ह दिलं होतं. माळशिरसमधून राम सातपुते आणि नायगावमधून राजेश पवार यांना तिकिट दिलं होतं. पण यावेळी आम्ही भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आरपीआयच्या चिन्हावरच लढू. आमच्या पक्षाला नागालँडमध्ये मान्यता आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्हाला आमच्या चिन्हावर लढवायची आहे, असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
आम्हाला दोन जागा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी स्वत: शिर्डीतून पराभूत झालो होतो. यावेळी मला शिर्डीतून संधी मिळाली तर मी लढेल. माझी राज्यसभेची कारकिर्द 2024 पर्यंत आहे. मी लोकसभेचा माणूस आहे. शिर्डी, पंढरपूर किंवा मुंबईतून उभा राहिलो असतो तर विजयी झालो असतो. मी राज्यसभा मागितली होती. मला लोकसभेची संधी मिळाली तर मी लढणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इंडिया आघाडीत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. गडकरी आले तर त्यांना पंतप्रधान पद देऊ अशी ऑफरच त्यांनी दिली आहे. त्यावरही आठवले यांनी चिमटे काढले. विनायक राऊत यांच्या ऑफरला अर्थ नाही. विनायक राऊत नितीन गडकरी यांना ऑफर देत असतील तर माझाही उद्धव ठाकरे यांना ऑफर आहे. उद्धव यांनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू, असा चिमटा आठवले यांनी काढला.