नागपूर : रामनवमी निमित्त यवतमाळ शहर राममय झाले. आज सकाळी शहरातून रामभक्तांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक या प्रभात फेरीत सहभागी झाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने ही रॅली काढली. ठिकठिकाणी यवतमाळकरांनी या प्रभातफेरीचे स्वागत केले. दत्त मंदिरातून निघालेल्या ह्या रॅलीचे जयहिंद चौक श्रीराम मंदिरात समापन झाले. दरम्यान, जयहिंद चौक आणि गणपती मंदिर चौकात 51 फूट उंच भगव्या ध्वजाची स्थापना करण्यात आली.
शिर्डीत आज मोठ्या जल्लोषात रामनवमी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस उत्सव साजरा केला जात आहे. उत्सवाच्या दुस-या दिवशी काकड आरतीनंतर फोटीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साईबाबांना सुवर्ण रत्नजडित अलंकार चढवण्यात आले. साईबाबांच्या समाधीवर भगवा ध्वज लावण्यात आला. दिवसभर पारंपरिक पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. साईभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.
बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. रामनवमीनिमित्त राज्याच्या काना कोपऱ्यातून भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झालेत. अतिशय आनंदमय आणि भक्तिमय वातावरण सध्या शेगावात पाहायला मिळत आहे. जवळपास तीन तास दर्शनासाठी लागतात. भाविकांची मोठी रांग लागलीय.
नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिरात रामाचे दर्शन घेतले. फडणवीस म्हणाले, रामनवमीचा उत्सव हा नागपुरात उत्साहात साजरा होतो. संध्याकाळी शोभायात्रा निघेल. सकाळी याठिकाणी रॅली आहे. नागपूरच्या शोभायात्रेचं मोठं महत्त्व आहे. ही ऐतिहासिक शोभायात्रा आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरच्या जंगलातून राममंदिरासाठी सागवान लाकूड दिले गेले. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरात आज राम नवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी सकाळपासून भक्तांनी मोठी गर्दी केली. हे मंदिर ऐतिहासिक असून गेल्या 57 वर्षांपासून राम जन्माच्या नंतर इथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येते. नागपूरच्या या राम मंदिरात सकाळपासून दर्शनाससाठी गर्दी झाली आहे.