नागपूर : खासदार नवनीत राणा यांना काही अटींवर हनुमान चालिसा पठणसाठी परवानगी देण्यात आलीय. राणा दाम्पत्याला रॅलीची परवानगी नाकारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवनीत राणा यांना वेगळा वेळ दिलाय. राष्ट्रवादीचा कार्यक्रम संपल्यावर राणा दाम्पत्याला हनुमान चालिसासाठी वेळ दिलाय. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली. अटी शर्थीचं उल्लंघन झाल्यास कारवाई होणार असंही पोलीस आयुक्तांनी ( Commissioner of Police) म्हटलंय. राष्ट्रवादीला दुपारी बारा वाजतापासून वेळ दिलाय. राष्ट्रवादीचा (NCP) कार्यक्रम संपल्यावरच राणा दाम्पत्याला परवानगी देण्यात आली. राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्याच्या कार्यक्रमात भोंग्याची परवानगी नाही. राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक वक्तव्य करु नये ही अट घातलीय. राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीचा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं मंदिर परिसरात पोलीस फौजफाटा तयार करण्यात आलाय.
राणा दाम्पत्य मुंबईत कैदेतून सुटल्यानंतर पहिल्यांदा विदर्भात येत आहेत. नवी दिल्लीवरून ते नागपूर विमानतळावर उतरतील. त्यानंतर त्यांचं विमानतळावर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येईल. राणा दाम्पत्यांनी नागपुरात आल्यानंतर रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी परवागनी मागितली. राज्यावर अनेक संकट आहेत. ते दूर करता यावीत, यासाठी हनुमान चालिसाचं पठण राणा दाम्पत्य करणार आहेत. पण, याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही देशावरील संकट महागाई दूर व्हावी, यासाठी हनुमान चालिसा पठणाचं याच हनुमान मंदिरात आयोजन केलंय. शनिवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो. त्यामुळं या दिवसाला धार्मिक महत्त्व आहे.
हनुमान मंदिरात राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्यांच्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची परिस्थिती होती. त्यामुळं पोलीस आयुक्तांनी खबरदारी म्हणून दोघांनाही वेगवेगळा वेळ दिला. आधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हनुमान चालिसाचे पठण करतील. त्यानंतर राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात येतील. पण, विमानतळापासून हनुमान मंदिरापर्यंत येताना रॅलीची परवानगीही पोलीस आयुक्तांनी नाकारली आहे. शिवाय मंदिरातील भोंग्यांमधून हनुमान चालिसा म्हणता येणार नाही. दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीतर्फे अकरा पंडित हनुमान चालिसा म्हणतील. त्यांचं चालिसा पठण झाल्यानंतर राणा दाम्पत्यांना वेळ देण्यात आला आहे.