नागपूर : पशुसंवर्धन विभागाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय (District Veterinary General Hospital) येथे पशु वेशभूषा स्पर्धा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आकर्षक वेशभूषा केलेल्या श्वानांनी संगीताच्या तालावर कॅटवॉक ( Catwalk) केले. 67 श्वानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. युवराज केने (Dr. Yuvraj Kene), डॉ. संजय धोटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रियवंदा सिरास, डॉ. पल्लवी गावंडे, डॉ. कविता साखरे, डॉ. विद्याधर धनबहाद्दूर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मोफत श्वानदंश रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 60 श्वानांना लसीकरण करण्यात आले. शेळी, श्वान व मांजर या तीन गटात ही स्पर्धा झाली. विविध रंगीबेरंगी वेशभूषा केलेल्या श्वानांनी रॅम्पवर चालताना उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
वेशभूषा केलेल्या प्राण्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. पशुप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डॉ. प्रज्ञेय ताकसांडे आणि डॉ. चित्रा राऊत यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पहिले. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे निबंधक तथा प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बलदेव रामटेके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. श्वान गटामध्ये प्रकाश मायकल यांच्या गट्टू या श्वानाने प्रथम क्रमांक पटकाविला.
गौरव नेवारे यांच्या अॅरॉन या श्वानाने द्वितीय, सिद्धार्थ चवरे यांच्या लोकीने तृतीय क्रमांक, तसेच गार्गी जोशी यांच्या रँचो या श्वानाने प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले. मांजर गटामध्ये अॅड. एम. आर. खान यांची स्नोबेल प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. अब्दुल रज्जाक यांची बॉब आणि पीयूष खातरकर यांची मन्नु या मांजर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. शेळी गटात इजाज भाई यांच्या सुल्तानने प्रथम क्रमांक, श्रीमती हसीना बानो यांच्या कुरबानने द्वितीय आणि श्री नरेंद्र यांच्या बोबो हिने तृतीय क्रमांक पटकाविला.