नागपूर : भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होतो. त्यामुळं भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. महाराष्ट्रातील लातुरमध्ये नागपुरातून रेल्वेने पाणी पुरविण्यात आले होते. अशी भीषण स्थिती कुठेही निर्माण होऊ शकते. ती होऊ नये यासाठी पाण्याच्या नियोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. नागपूर (Nagpur) महापालिकेने (Municipal Corporation) घराघरातून निघणारे सांडपाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर करण्याबाबत पुढाकार घेतला. यामुळे स्वच्छ पाण्याची बचत झाली. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्याबाबत मनपा आता पुढे आली. पूर्व नागपुरातून या प्रकल्पाची सुरुवात होत आहे. जलसंवर्धनाच्या दिशेने पुढेही मनपा अग्रेसित राहणार आहे, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, आयओटीचा वापर करून भूजल पातळी आणि पाण्याच्या गुणवत्तेचे रिमोट मॉनिटरींग हे वैशिष्ट्य प्रकल्पाचा एक अभिनव आणि अद्वितीय भाग आहे. स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. नागरिकांना रेन वाटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून दिले. नागपूर महापालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त माध्यमातून पूर्व नागपुरातील संत कबीर शाळेमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आलाय.
आयओटी आधारित भूजल पुनर्भरण या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाला युरोपियन कमिशनचे अनुदान मिळाले. आयसीएलईआय साऊथ एशियाच्या सहकार्याने अर्बन लिड्स अंतर्गत राबविण्यात आलेले आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाबद्दल मनपा व स्मार्ट सिटीचे अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या माध्यमाने या भागात भूजलची परिस्थिती उत्तम होण्यास मदत मिळेल. नागपूर शहराच्या बाहेरील भागामध्ये विकासकामे करण्यात अनेक अडचणी येतात. इकलीचे सहायक व्यवस्थापक शादरुल वेणेगुरकर यांनी प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले. महापौर म्हणाले, आधीच्या काळात छोटे छोटे तलाव निर्माण करून त्यात पावसाचे पाणी साठविले जायचे. साठलेले पाणी जमिनीत झिरपल्याने भूजलपातळी वाढायची. आता सगळीकडे सिमेंटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे असे प्रकल्प यासाठी महत्वाकांक्षी ठरतात. रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्पाद्वारे केवळ पाणी जमिनीत जिरवले जाणार नसून आधी त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ केले जाईल. स्वच्छ पाणी जमिनीत जिरविण्यात येईल.