नागपूर : गरिबी माणसाला कुठं नेऊन ठेविल काही सांगता येत नाही. याचा गैरफायदा घेणारे समाजात काही जण टपून बसले असतात. उजबेकिस्तान हा गरीब देश. या देशातील युवक-युवती रोजगारासाठी भटकत असतात. अशावेळी कमी वेळात जास्त पैसे देण्याचे आमिष काही तरुणींना दाखवले जाते. त्याला काही तरुणी बळी पडतात. अशीच एक उजबेकिस्तानची तरुणी कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लोभाला बळी पडली. तिला नागपुरात आणण्यात आलं. देहव्यापारात ढकलण्यात आलं. पण, काल एका छाप्यात तिला ताब्यात घेण्यात आलं. त्यातून तिची सुटका करण्यात आली. दलालांना अटक करण्यात आली.
नागपूरच्या वर्धा मार्गावर असलेल्या एका पॉश हॉटेल मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. नागपुरातील एका स्टार हॉटेल मध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. याप्रकरणी दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. एका उजबेकिस्तानच्या तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींनीची सुटका केली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने माहितीच्या आधारे हॉटेल प्राईडमध्ये सापळा रचून 2 दलालांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार यांचा समावेश आहे. व्हॉटसअपच्या माध्यमातून हे दलाल ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना तरुणी उपलब्ध करून द्यायचे. या प्रकरणी उजबेकिस्तान येथून आलेली एक तरुणी आणि दिल्ली येथील 2 तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
आरोपीने दहा हजार रुपयांचा सौदा करून अजबेकिस्तानच्या मुलीला त्या खोलीत पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार या दलालांना अटक केली.
हॉटेल प्राईडचे महाव्यवस्थापक म्हणाले, आरोपींनी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली होती. आरोपींनी सर्व कागदपत्र सादर केली. त्यानंतर त्यांना हॉटलेच्या खोल्या देण्यात आल्या. हॉटले प्रशासनाने पोलिसांना मदत केली. आवश्यक ती सर्व कागदपत्र त्यांना पुरविली.
तीन तरुणींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवले. आरोपींकडून सहा मोबाईल, एक चार चाकी गाडी जप्त करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक सारीन दुर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी नेरकर, अनिल अंबाडे, समीर शेख, अश्वीन मांगे, संदीप चंगोले, सुभाष चौधरी यांनी कारवाई केली.