नागपूर : मुंबईत संदीप राऊत (Sandeep Raut) या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे. राऊत यांचा नातेवाईक असल्याचं सांगून 11 जणांना गंडा घातला. पण, संदीप नावाचा कोणताही व्यक्ती माझ्या परिवारात नाही. त्याच्याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. माझ्या विभागाला (Energy Department) मी त्याच्याविरोधात तात्काळ कारवाई करायला सांगितली, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री (Guardian Minister) डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागानं गुन्हा दाखल केला. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. नावाचा असा दुरुपयोग करणारा असा कोणीही असो मग तो माझा पुतण्या असो की भाचा. असं कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. हा गृहस्थ जो माझ्या नावाचा गैरवापर करत आहे त्याचा प्रश्नच उरत नाही. कारण तो नातेवाईक सुद्धा नाही. त्यामुळं त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यात कुठेही कमरता राहणार नाही. त्यासंदर्भात गृह विभागाला सूचित केले आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
संदीप राऊत नावाच्या व्यक्तीला मी कधी भेटलो नाही. त्यांच्याशी कधीच संपर्क नाही. नितीन राऊतही नागपूर शहरात अनेक आहेत. राऊत हे आडनाव कॉमन आहे. या नावाचा कुणी गैरफायदा उचलत असेल, तर त्याची खैर केली जाणार नाही. राऊत नावाचा कुणी वापर करत असेल, तर तो मीच आहे, असं समजू नका. यासंदर्भात शहानिशा करूनच निर्णय घ्यावा, ही माझी विनंती राहील, असंही पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले.
राज्यात वीज निर्मितीसाठी कोळशाची टंचाई कायम आहे. नाशिक, कोराडी, पारस, येथील महाजेनकोच्या प्लान्टमध्ये फक्त दीड दिवस पुरेल येवढा कोळसा आहे. भुसावळ येथील महाजेनकोच्या प्लान्टमध्ये फक्त अडीच दिवस पुरेल असा कोळसा आहे. कोळसा टंचाई आहे. पण योग्य नियोजन करतोय. त्यामुळं सध्या महाराष्ट्रात विजेचं कुठंही भारनियमन नाही, असंही मंत्री राऊत यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुक्ष्म नियोजन करण्यात आलंय. कोळसा येत आहे. 80 टक्के कोळसा मिळतो. दररोज कसंतरी भागवून कोणत्याही परिस्थिती वीज भारनियमन होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. कोळसा साठवण्यासाठी कोळसा आयात केला जात आहे. देशी, विदेशी कोळसा साठवणूक करू. येणाऱ्या डिसेंबरपर्यंत कोळसा पुरेल, असं नियोजन केल्याचं ते म्हणाले.