नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या तीन दौऱ्यानंतरही नागपूर शिवसेनेत खदखद कायम आहे. महानगर प्रमुखांच्या मतदारसंघात बदल झाल्याने खदखद वाढली. महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांचा गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) जुन्या शिवसैनिकांची पक्षात कोंडी करत असल्याची तक्रार करणार आहेत. संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर जुने शिवसैनिक नाराज असल्याची माहिती आहे. महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे (Pramod Manmode) यांच्यासोबत नागपुरातील किशोर कुमेरिया (Kishore Kumeria) यांना प्रमुख केले. दोघांनाही तीन-तीन विधानसभा मतदारसंघ वाटून दिले. मानमोडे यांच्याकडं पश्चिम, मध्य व पश्चिम नागपूर तर कुमेरिया यांच्याकडं पूर्व, उत्तर व दक्षिण नागपूरची जबाबदारी दिली. नागपुरात महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संजय राऊत यांनी शिवसेनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेतील अंतर्गत वाद काही शांत होताना दिसत नाही.
नागपूर शिवसेना जिल्हा प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेत आले. तेव्हापासून जुने आणि नवीन शिवसैनिक असा वाद सुरू झाला. प्रमोद मानमोडे हे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या गटातील आहेत. प्रमोद मानमोडे यांनी महानगरप्रमुख केल्यानं जुने शिवसैनिक नाराज झाले होते. त्यामुळं तीन-तीन विधानसभा वाटप करून दोन महानगरप्रमुख करण्यात आले. किशोर कुमेरिया यांच्याकडं महानगरप्रमुख पद देण्यात आलं. यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लक्ष घातलं. त्यांनी नागपुरात तीन दौरे केले. वाद निवडण्याचा प्रयत्न केला. पण, हा वाद काही शमताना दिसत नाही. याची तक्रार किशोर कुमेरिया हे वरिष्ठांकडं करणार आहेत.
खासदार संजय राऊतांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या गडात शिरकाव केलाय. याठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचं स्वप्न ते पाहत आहेत. पण, अंतर्गत वाद काही शमत नाही. त्यामुळं त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राऊतांनी नागपुरात येऊन मुक्काम केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी ते बोलले. सभेत नागपूर मनपावर शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला. पण, कार्यकर्त्यांची एकजूट नसल्यानं नागपूर मनपावर शिवसेनेचा झेंडा कशा फडकणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.