बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन गाजत आहे. आज याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या खून प्रकरणाचा जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन दिले. तर या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा(Mocca) लावण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले. तर बीडच्या पोलीस अधिक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
वाल्मिक कराडवर गुन्हा होणार दाखल
मस्साजोग येथे पवनचक्कीचे उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजेक्ट अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. तर वाल्मिक कराड याने धमकी दिल्याचे समोर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय या निमित्ताने या सभागृहाला अस्वस्थ करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडला आहे, याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणा कुणा सोबत फोटो आहे. सगळ्यांसोबत होते आमच्या सोबत आहे, यांच्यासोबत पवार साहेबांकडे सोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मोक्का लावणार
या सर्व प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत. त्यांच्यावर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बीडमधील अराजकतेचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यासर्व प्रकरणात पोलीसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पोलीस प्रशासन त्यासाठी दोषी ठरवले. अगोदर फिर्याद नोंदवायची आणि नंतर बी समरी करायची या खेळीवर आसूड ओढला.
एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी
या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. एक आयजी दर्जाचा अधिकारी यांच्याअंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे ती एस आय टी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास होईल. तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येईल. साधारणपणे तीन ते सहा महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.