नागपूर: नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कोणत्याही क्षणी निलंबनाची कारवाई होणार आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून काँग्रेसचं नाव आणि काँग्रेसचा लोगो हटवला आहे. सत्यजित तांबे हेच काँग्रेस सोडत असल्याची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तांबे यांच्या या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. तसेच सत्यजित तांबे यांनी अद्याप भाजपकडे पाठिंबा मागितला की नाही? यावरही तर्कवितर्क लढवले जात असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडी के दिल के टुकडे हुए हजार, कही कहाँ गिरा, तो कही कहाँ गिरा… अशी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली आहे. सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं नाही.
जर त्यांनी समर्थन मागितलं तर पार्लमेंट्री बोर्डाकडे संमती मागण्याचा प्रयत्न करू. पण त्यांनी समर्थन मागितलं नाही, असं सांगतानाच भाजप आता अपक्षाच्या भूमिकेत आहे. काळ ठरवेल आमचं समर्थन कुणाला असेल ते, असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
दैनिक ‘सामना’त आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सामनात काय छापून येतं हे महत्त्वाचं नाही. ते त्यांचं घरगुती वृत्तपत्रं आहे. सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक, वाचणारे आणि पाहणारे तेच आहेत.
त्यामुळे सामना हा त्यांचा घरगुती सिनेमा झालाय. राहिला जाहिरातीचा प्रश्न तर जाहिरात आणि बातम्यांचा काही संबंध नाही. प्रत्येक वृत्तपत्राला जाहिरात जातच असते. कोणत्याही विचाराची प्रेस असली, मुखपत्रं असेल तरीही जाहिरात जाते. त्यावर एवढा विचार करण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जो विकास करण्यासाठी येत आहेत. त्यातील एकही काम उद्धव ठाकरे यांच्या काळातील नाही. त्यांचं काम असतं तर त्या काळात टेंडर निघाले असते. पण ते निघाले नाहीत. कंत्राट कुणाला द्यायचं यावर त्यांनी दिवस काढले. म्हणून मुंबईतील विकास कामे होऊ शकली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.