नागपूर : पैसे कमवण्याच्या नादात कोण काय करेल, काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार हिंगण्यात उघडकीस आला. सुगंधी तंबाखू तयार करण्याचा चक्क कारखानाच घरी उभारला होता. त्यावर धाड टाकून पोलिसांनी दोघाही बापलेकाला बेड्या ठोकल्या. आता त्यांनी जेलची हवा खावी लागणार आहे.
तीन जानेवारीला पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, हिंगणा रोड यशोधरानगरात एनआयटी गार्डन, रॉय इंग्लिश स्कूलच्या मागे सुगंधी तंबाखूची कंपनी आहे. घरीच अवैधरीत्या केमिकलचा वापर करून ही कंपनी चालविली जात असल्याचं सागंण्यात आलं. यावरून एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत दोघेही बापलेक मशीन लावून केमिकल वापरून तंबाखू सुगंधित करत होते. या धाडीमध्ये नवरत्न पॉकेट, तीन लाख 65 हजारांची तंबाखू, 60 हजारांची मशीन जप्त करण्यात आली. नागपूरच्या एमआयडीसी परिसरात वडील आणि मुलाने चक्क अवैध सुगंधी तंबाखू बनविण्याचा कारखाना थाटला होता. एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकत मुद्देमाल जप्त केला.
याशिवाय ग्लिसरीन, मिथेनॉल, गुलाबजल, दालचिनी पावडर जप्त करण्यात आले. राहुल जयस्वाल व अनिल जयस्वाल या दोघांनाही अटक करण्यात आल्याचं एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उमेश बेसरकर यांनी सांगितलं. विशेष म्हणजे त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन नव्हते. नागरिकांच्या जीवनाशी त्यांनी खेळ मांडला होता. पोलिसानी छापा टाकून सुगंधित तंबाखूसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नागपुरात गुटखा खाण्याचं मोठं चलन आहे. त्याचा फायदा घेत हे अवैध आणि जहरी सुगंधी तंबाखू बनवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करतात. हाच खेळ आता त्यांच्या जीवाशी आला आहे. म्हणून धंदा करताना चांगला करावा. दोन नंबरचे पैसे केव्हा जातील, काही सांगता येत नाही.