नागपूर : प्रभाग सव्वीसमधील समस्यांच्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम (Corporator Adv. Dharmapal Meshram) यांच्या विनंतीवरून महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी मंगळवारी मनपा व नासुप्रच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopade), उपमहापौर मनीषा धावडे, नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, नगरसेविका मनीषा कोठे, समिता चकोले, मुख्य अभियंता प्रदीप खवले, नासुप्रचे मुख्य अभियंता एस.एन. चिमुरकर, मनपा उपायुक्त (मालमत्ता) विजय हुमने, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, उपअभियंता राजेश दुफारे आदी उपस्थित होते. प्रारंभी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रभाग सव्वीसमधील समस्यांची महापौरांना माहिती दिली. प्रभाग सव्वीसमध्ये सुमारे पाच हजारांवर घरांची वस्ती आहे. या भागातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बाहेर प्रवाहित केले जाणे आवश्यक आहे. यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत प्रशासनाला पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रशासनाद्वारे कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी पुढील कार्यवाहीबाबत स्थावर विभागाकडे पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. प्रभाग सव्वीसमध्ये मनपाची जागा असल्याची माहिती उपायुक्त विजय हुमने यांनी दिली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता या भागातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी किती जागा लागणे अपेक्षित आहे, याची माहिती प्रशासनाकडून घेतली. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया उभारणे आवश्यक आहे. यासाठी पाच एकर जागेची गरज असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्या मार्फत सादर करण्यात आली.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी पाच एकर जागा नासुप्रला देण्याबाबत कार्यवाही करून तो प्रस्ताव सभागृहात सादर करण्याचे निर्देश यावेळी महापौर तिवारी यांनी दिले. विश्वशांती नगर ते वाठोडा दरम्यान रस्त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचीही नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी महापौरांना माहिती दिली. सदर रस्त्याबाबत येणा-या अडचणी लक्षात घेता याबाबतच्या सविस्तर माहितीची फाईल सादर करण्याचे निर्देश महापौर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.