नागपूर : ते जर एक इंच जागा देत नसतील तर आम्ही अर्धा इंच जागा देणार नाही. आमच्या पाण्यावरती ते आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये आम्ही देखील कठोर भूमिका घेऊ. जर अशा पद्धतीचा वक्तव्य ते करत असतील तर भविष्यामध्ये कर्नाटकला जाणार महाराष्ट्रातलं जे पाणी आहे ते आम्ही बंद करून टाकू, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. देसाई म्हणाले, प्रकरण कोर्टात आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. तिथे ते देखील उपस्थित होते. असं असताना देखील जर ते असं विधान करत असतील तर हे महाराष्ट्राची थट्टा करण्याचे काम आहे. हे आम्ही सुद्धा सहन करणार नाही आम्ही त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊ, असा सज्जड दम शंभूराज देसाई यांनी दिला.
संजय राऊत काय बोलतात याला काही महत्त्व नाहीये. संजय राऊत यांनी बेळगावसाठी कधी लाटा काटा खाल्ल्यात. कधी आंदोलन केली आहेत. कधी तर तिथे गेलेले आहेत. आम्हाला तरी माहीत नाही. त्यामुळे त्यांनी जास्त बोलू नये, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला.
देसाई म्हणाले, साडेतीन महिने संजय राऊत तुरुंगात राहून आले. त्यांचे डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांनी काही बोलावं त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका ठामपणे मांडत आहोत.
ग्रामपंचायतमध्ये आम्हाला सर्वात जास्त जागा मिळालेले आहेत. हे वारंवार म्हणत होते की, जनता तुम्हाला कौल देणार नाही. पण जनतेने आम्हालाच कौल दिलेला आहे. जनतेची विश्वासार्हता जिंकण्यामध्ये आम्ही तिथे यशस्वी ठरलेलो आहोत.
त्यामुळे सत्य काय आहे ते जगासमोर आले. यांच्या बोलण्याला काही महत्त्व नाहीये. सर्व आमदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना जास्त जागा मिळताना पाहायला दिसतात. राष्ट्रवादीच्या 24 जागा आमच्याकडे जास्त आलेले आहेत. त्यामुळे सत्य काय आहे ते जनतेला माहीत आहे, असा टोलाही शंभूराज देसाई यांनी लगावला.