लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला. चार पक्ष एकत्र आल्याने महायुतीने महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात महायुतीची दाणादाण उडाली आहे. आता या निवडणुकीतील पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जात असून त्यावर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या पराभवावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम, शंभुराज देसाई, संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही मोठं विधान केलं आहे. गायकवाड यांनी थेट भाजपच्या निवडणुकीतील अंतर्गत सर्व्हेवरच बोट ठेवलं आहे. त्यामुळे महायुतीत जुंपणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या जागा अचानक बदलल्या गेल्या. ठाणे आणि अमरावतीवरही भाजपने दावा केला होता. त्यामुळे वातावरण खराब झालं होतं. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आम्ही 7 वरून 14 जागांवर नक्की गेलो असतो. आमच्या 15 पैकी 13 ते 14 जागा नक्की आल्या असत्या. हा सगळा खेळ केला. भाजपने सर्वे केला त्यामुळे हे घडले. सर्व्हे केला होता तर तो गुप्त ठेवायला हवा होता. सर्व्हे जाहीर का केला?, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.
भाजपच्या लोकांमुळेच आम्हालाही आणि त्यांनाही लोकसभा निवडणुकीत फटका बसला, असं सांगतानाच आता आम्ही विधानसभेत 100च्या पुढे जागा लढल्या पाहिजे. एकनाथ शिंदे जर 100 जागा लढतील तर 80 जागा जिंकतील, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या विधानवरही भाष्य केलं. रामदास कदम जे काही बोलले ते गंमतीने बोलले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. अजितदादांनी आमच्यासोबत येऊ नये असं त्यांना म्हणायचं नव्हतं. पण अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी भाजपचा होता, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली. ज्या दिवशी काँग्रेस कमरेत लाथ घालेल, त्या दिवशी तुमची औकात कळेल. राज्यातल्या आणि देशातल्या मुस्लिमांनी व्होट जिहाद केला म्हणून तुमच्या पदरात काहीतरी पडले. ज्या दिवशी काँग्रेस तुम्हाला सोडेल त्या दिवशी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची औकात कळेल. आमचे 7 शिलेदार निवडून आणले. वेडात वीर दौडले छाताडावर नाचायला. तुम्ही 21 जागा लढल्या 9 निवडून आणल्या. तेही काँग्रेसच्या भरवश्यावर असा हल्लाही त्यांनी चढवला.