नागपूर : शहराच्या सीमेच्या लगत असलेल्या हुडकेश्वर खुर्द (Hudkeshwar Khurd) भागात रात्री अस्वल शिरले. त्यामुळं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रात्री कुत्रे जोरजोरात ओरडत असल्याने टॉर्चच्या प्रकाशात नागरिकांनी शोध घेतला. पाहतात तर काय एक मोठी अस्वल दिसून आली. नागरिकांनी टॉर्चच्या प्रकाशात अस्वलीचा व्हिडीओ शूट (Bear video shoot) केला. त्यात ती स्पष्टपणे अस्वल असल्याचं दिसत आहे. हुडकेश्वर खुर्द भागापासून समोर झाडी भाग आहे. उमरेड-कऱ्हाडला जंगल (Umred-Karhadla Jungle) देखील जवळ आहे. त्यामुळे चुकून शिकारीच्या शोधात अस्वल शहराकडे आल्याचा अंदाज आहे. रात्री वन विभागाच्या चमूने गावात जाऊन आढावा घेतला. अस्वल जंगलात परत कशी जाईल, असा प्रयत्न वन विभाग करणार असल्याची माहिती आहे. या भागात मोठी नागरी वस्ती आहे. त्यामुळं अस्वलीला रेस्क्यू करून जंगलात सोडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 12, 2022
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात बिबट्याची दहशत आहे. 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता खैरी (पट) येथील शुभम भागडकर व राकेश दोनाडकर हे दोघे जनावरांच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते. हा गोठा गावातीलच चुलबंद नदीकडे स्मशानभूमी परिसरात आहे. घराकडे परत येत असताना गोठ्यासमोर एक बिबट व त्याच्या बछडा दिसला. घाबरगुंडी उडाल्याने ते दोघेही गोठ्यातच लपून राहिले. गोठ्याचे दार आतून दार बंद केले. घटनेची माहिती ग्रावकऱ्यांना फोनवरून दिली. गावकरी लाठ्याकाठ्यांसह आले. तोपर्यंत बिबट्या व त्याचा बछडा पसार झाले.
बिबट्या पसार झाल्यानंतर दोन्ही तरुणांना गावकऱ्यांनी बाहेर काढले. हे तरुण खूप घाबरले होते. घटनेची माहिती लाखांदूर वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांना देण्यात आली. वनरक्षक जी. डी. हाते, एस. जी. खंडागळे, आर. एम. मेश्राम, विकास भुते घटनास्थळी दाखल झाले. फटाके फोडून बिबट्याला हाकलून लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी व पहाटे शेतशिवारात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.