नागपूर : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खचलेल्या शिवसैनिकाच्या जोश भरण्याचं काम राज्यात सुरू झालंय. यासाठी आता मुंबईहून विधानसभा संपर्क प्रमुखांना नागपुरात पाठविण्यात आल्या आहे. या संपर्क प्रमुखांनी रेशीमबागेतील शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan in Reshimbage) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शिवसेनेत बंडखोरीनंतर (Rebellion) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) डॅमेज कंट्रोलसाठी सज्ज झाले आहेत. पक्षातील सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी यांना पक्षासोबत जोडून ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. यासाठी शिवसेना आता कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. 53 पैकी 39 आमदार हे शिंदे गटात आहेत. त्यामुळं सामान्य कार्यकर्ते पेचात सापडले आहेत. बहुतेक कार्यकर्ते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना मानतात. पण, काही कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात जात आहेत. ते शिंदे गटात जाऊ नये, यासाठी हा सर्व डॅमेज कंट्रोलचा भाग आहे.
नागपुरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याकरिता मुंबईहून विधानसभा संपर्क प्रमुखांना पाठवण्यात आले आहे. नरेश माळवे, सुरज राठोड व अखिलेश काळे या संपर्क प्रमुखांना नागपुरात पाठवण्यात आले. या संपर्क प्रमुखांनी शिवसैनिकांनी विधानसभानिहाय मार्गदर्शन केलं. भलेही 40 आमदारांनी गद्दारी केली तरी ते पुढच्या विधानसभा निवडणुकीत विधानभवनात दिसणार नाही. शिवसेना ही संघटना शिवसैनिकांवर चालत आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असं सांगत शिवसैनिकाच्या विश्वास निर्माण करण्यात आला.
आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांनी दिली. शिवसेनेने आता आपल्या पक्ष बळकटीकरणावर जोर देणे सुरू केले आहे. अजून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. तो दूर करण्यात शिवसेना कितपत यशस्वी हे पाहावं लागणार आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था आता शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांची झाली आहे. यात एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊ नये, यासाठी हा डॅमेज कंट्रोल करण्याचं काम शिवसेनेच्या नेतृत्वाकडून केलं जातंय.