नागपूर | 28 डिसेंबर 2023 : आज देशाचं लक्ष महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरकडे आहे. कारण काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘है तय्यार हम’ ही महारॅली काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे. त्या नागपुरात येणार नाहीत. सोनिया आणि प्रियांका गांधी या महारॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.
भाजपचा गड असलेल्या नागपुरात काँग्रेस आज सभा घेत आहे. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात आज होणारी ही महासभा ही आगामी निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे. आज नागपुरातील उमरेडमध्ये काँग्रेसची सभा होतेय. ‘है तय्यार हम’ ही महारॅली देखील काढली जाणार आहे. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे देशभरातील नेते उपस्थित आहेत. राहुल गांधी नागपूरमध्ये दाखल झालेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते या महारॅलीत सहभागी झालेत.
काँग्रेसच्या नागपूर येथील है तय्यार हम महारॅलीत वर्धा जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. वर्धा जिल्ह्यातून अंदाजे 25 हजार कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून वाहनांच्या माध्यमातून कार्यकर्ते रॅलीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. सकाळपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी नागपूरला पोहोचत आहेत. नेते, पदाधिकऱ्यांकडून याबाबत नियोजन करण्यात आलंय.
परंपरेनं नागपूर आणि विदर्भ काँग्रेसचा गड राहिला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर आणि काँग्रेसचं जवळचं नातं आहे. 1920 साली नागपूरात काँग्रेसचं अधिवेशन होतं. नागपूरातूनच असहकार चळवळीचा निर्णय घेतला गेलाल. 1959 ला नागपूरातील काँग्रेसच्या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची AICC अध्यक्ष म्हणून निवड झाली. काँग्रेसचा वैचारिक संघर्ष असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरात 1925 ला स्थापना झाली. शिवाय महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे शहर आहे. त्यामुळे काँग्रेसने नागपूरची निवड केली.