नागपूर : मनपाच्या (Municipal Corporation) स्टेशनरी घोटाळ्या प्रकरणी वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. कंत्राटदार साकोरे कुटुंबीयांच्या पाच नव्हे, तर सात कंपन्या वेगवेगळ्या नावानं असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ऐवढेच नव्हे, तर गेल्या 40 वर्षांपासून साकोरे कुटुंबीयांनाच स्टेशनरीचे कंत्राट (Stationery Contract) मिळत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
मनोहर साकोरे याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने वेगवेगळ्या सात कंपन्या स्थापन केल्या. मनपाच्या विविध विभागांना स्टेशनरीचा पुरवठा या कंपन्यांद्वारे केला जातो. त्यापैकी चार कंपन्यांचा 67 लाखांचा घोटाळा बाहेर आला आहे. आरोग्य विभागाला स्टेशनरीची देयके विभागा प्रमुखांच्या स्वाक्षरीशिवाय उचलण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून हे सर्व सुरू आहे. त्यामुळं त्याचे लागेबांधे अधिकाऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकारामुळं हा घोटाळा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
कंत्राटासाठी कॅफोशी सेटिंग करणारे ठेकेदार अडचणी आले आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय कोल्हे (कॅफो) हेही या घोटाळ्यात अडकले आहेत. त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्यानं फाईल मंजुरीसाठी आधीच तडजोड करणारे कंत्राटदारही अडकले आहेत. संजय कोल्हे हे 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत असल्यानं त्यापूर्वी फाईल मंजूर करण्यासाठी कंत्राटदार व काही नगरसेवकांची धावपळ सुरू होती. परंतु, स्टेशनरी घोटाळ्यामुळं वित्त विभागातील फाईल मंजुरीची प्रक्रिया जवळपास ठप्प आहे. तसेच निवडणुकीपूर्वी प्रभागातील विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू होती.
याप्रकरणी आता पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. कालच मुख्य लेखा वित्त अधिकारी विजय कोल्हे व सहाय्यक आयुक्त महेश धामेचा या दोघांवर स्थायी समितीनं निलंबनाची कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी सांगितलं. या घोटाळाप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन कंत्राटदार आणि दोन कर्मचारी आहेत. या कंत्राटदाराच्या कामाची गेल्या पाच वर्षांची चौकशी केली जाणार आहे.