नागपूर : नागपूर विभागात एसटीच्या 135 निवृत्त कर्मचाऱ्यांची यादी तयार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग देण्याचा विचार महामंडळ करत आहे. यामुळं जुन्या कर्मचाऱ्यांनी धसका घेतला. या धसक्यानं पंधरा संपकरी पुन्हा कामावर रुजू झाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं बंद असलेल्या बसेसचं स्टेअरिंग आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात येणार आहे. नागपूर विभागात 135 सेवानिवृत्त एसटीच्या चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. निवृत्त एसटी चालकांना 20 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. नागपूर विभागात आतापर्यंत 20 एसटीच्या निवृत्त चालकांनी अर्ज केलाय. निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार आहेत. त्यामुळं नागपुरातील एकट्या गणेशपेठ आगारात 13 संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. त्यामुळं आता एसटी रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळ (एसटी)चे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर जवळपास दोन महिन्यानंतरही कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळं त्यांचा संप सुरूच आहे. परिणामी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. नागपूर विभागातही कर्मचारी संपावर कायम असल्याचे बसचे परिचलन रखडले आहे. यापूर्वीपर्यंत 21 कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यात गुरुवारी आणखी 12 जणांची भर पडली. ही बडतर्फ कर्मचार्यांची संख्या 33 वर पोहोचली आहे.
विभागातील संपकर्त्यांपैकी 435 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 159 कर्मचार्यांना बडतर्फची नोटीस देण्यात आली होती. त्यातील 12 कर्मचार्यांना गुरुवारी बडतर्फ करण्यात आले. तर दुसरीकडे आता बडतर्फ कर्मचार्यांच्या जागी नव्याने भरती प्रक्रिया एसटी महामंडळाने सुरू केली आहे. यात प्रामुख्याने सेवानिवृत्त कर्मचार्यांची निवड केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे महामंडळाकडून संपकरी कर्मचार्यांना कामावर येण्याचे आवाहन नियमितपणे करीत असताना गुरुवारी विभागातील आणखी 15 कर्मचारी रुजू झाले. यात प्रामुख्याने 10 चालक, 4 वाहक व 1 यांत्रिकी कर्मचार्यांचा समावेश आहे. गुरुवारी सर्वाधिक 25 बसेस धावल्या.