नागपूर : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत. असा ठराव मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विशेष समितीच्या बैठकीत पारित करण्यात आला. मनपा शाळेत एकूण 12,603 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात गणवेश मिळतील, असे मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी सांगितले.
नागपूर शहरात मनपाच्या सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. या सहाही इंग्रजी शाळांना पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या सहाही इंग्रजी शाळांमध्ये एकूण 480 विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र उल्लेखनीय बाब ही आहे की, यामध्ये केजी-1 आणि केजी-2 च्या वर्गात एकूण 551 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश जास्त झाल्यामुळे या शाळांमध्ये केजी-1 आणि केजी-2चे दोन-दोन वर्ग सुरु केले जाणार असल्याचे मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रा. दिलीप दिवे म्हणाले, ज्येष्ठ नगरसेवक आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या 70 लाखाच्या अनुदानातून मनपाच्या 7 शाळांमध्ये अद्ययावत प्रयोग लॅब तयार करण्यात आलेल्या आहेत. या सर्व लॅब तयार झाल्या असून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहेत. सध्या मनपा शाळांच्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांना या लॅबमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे मनपाचे विद्यार्थीसुद्धा अभ्यासक्रमातील जवळपास 200 प्रयोग ते स्वतः करू शकणार आहेत.
लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा, एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा, दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा, जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा, राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा व संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा याठिकाणी लॅब तयार करण्यात आलेल्या आहेत.