नागपूर : तुम्हाला सांगितलं की, आता कॅमेरा आग रोखणार आहे, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, होय आता आग रोखू शकले, असा कॅमेरा आलाय आणि तोही नागपुरात. मेयो रुग्णालयात हा कॅमेरा आग रोखणार आहे.
हा ॲाक्सिजन गळती ओळखणारा अल्ट्रा सॅानिक कॅमेरा आहे. याची मदत अचानक आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा राज्यातील पहिला कॅमेरा मेयो रुग्णालयात लागणार आहे. मेयो हॅास्पिटलमधील डॅाक्टरांनीच याची माहिती दिली आहे.
राज्यात हॅास्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात लागलेला आगीत जवळपास 72 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. शॅार्ट सर्किट आणि ॲाक्सिजन गळती, ही हॅास्पिटलमध्ये आग लागण्याची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे हॅास्पिटलमध्ये लागणाऱ्या आगी आता कॅमेरा रोखणार आहेत.
नागपुरातील मेयो हॅास्पिटलमध्ये ॲाक्सिजन गळती ओळखणारा अल्ट्रा सॅानिक कॅमेरा लावण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात ॲाक्सिजन प्लांट उभारले आहे. ॲाक्सिजनचा वापर वाढणार आहे. यातून ॲाक्सिजन गळती होऊन आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ॲाक्सिजन गळती ओळखणार अल्ट्रा सॅानिक कॅमेरा लावून आग रोखण्याचा प्रयत्न केला जाणार, अशी माहिती मेयो रुग्णालयातील डॅा. वैशाली शेलगावकर यांनी दिली.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका वॉर्डाला आग लागली. या आगीत १४ बालकांचा जीव गेला होता. याला कर्मचाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं होतं. अशाप्रकारची आग का लागते, त्याचं ऑडिट करणं आवश्यक होते. या दिशेने प्रयत्नही झाले. आता अशी आग रोखणारा कॅमेरा आल्यानं आगीवर नियंत्रण मिळविता येईल, अशी अपेक्षा आहे.