नागपूर : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 698 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागपूर मनपाकडून पुन्हा कंटेनमेंट झोनची तयारी सुरू झाली आहे. स्थायी समितीत बॅरिकेड्स आणि टीन शेडसाठी चार कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बॅरिकेड्स लावण्यासाठी सहा कोटींचा खर्च आला होता. एकाच परिसरातील जास्त लोक पॅाझिटिव्ह आल्यास कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे.
दिवसाआड देशाबाहेरून प्रवास करून येणार्यांनी चिंता वाढविली आहे. यामुळे शहरासोबतच ग्रामीणमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही सातशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. शुक्रवारी दुबई रिटर्न पंधरा जणांसह तब्बल 698 नव्या बाधितांची भर पडल्याने प्रशासन अलर्टवर आले आहे. तर दिवसभरात केवळ 132 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
ओमिक्रॉनसोबतच डेल्टाचाही प्रकोप सध्या जिल्ह्यात कायम आहे. यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. केंद्राच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनही विदेशातून प्रवास करून येणार्या प्रत्येक व्यक्तींची विमानतळावरच कोविडची चाचणी करण्याला प्राधान्य देत आहे. शुक्रवारी शहरात 5547 व ग्रामीणमध्ये 3465 अशा जिल्ह्यात 9012 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी शहरातून 593, ग्रामीणमधून 89 व जिल्ह्याबाहेरील 16 अशा 698 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यामध्ये शुक्रवारी दुबईवरून आलेल्या विमानातील 94 पैकी 15 जणांचेही अहवाल कोविड सकारात्मक आढळून आलेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील 11 व्यक्तींचाही समावेश आहे. हे कुटुंबीय महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनअंतर्गत वास्तव्यास आहेत. सध्या त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा एक नमुना जनुकीय चाचणीकरिता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी कोविड मृत्यू शून्य असल्याने प्रशासन समाधानी आहे. परंतु दैनंदिन वाढती रुग्णसंख्या ही नागपूरकरांसोबतच प्रशासनाच्याही चिंतेत भर घालणारी आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून आयुक्तांच्या कॅबीनमधून संपूर्ण शहरावर वॅाच ठेवणार आहे. शहरातील तीन हजार सहाशे सीसीटीव्हीचं आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या कॅबीनमध्ये मॅानेटरिंग करतील. कोरोना नियम तोडल्यास थेट आयुक्तांच्या कॅबीनमधून कारवाईचे आदेश दिले जातील. नागपुरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.