नागपूर : जिल्ह्यात गेल्या पावणेदोन वर्षांपूर्वीपासून कोरोनाशी (Corona) युद्ध पुकारले ते सुरूच आहे. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली. कोरोनाने पुन्हा अक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला. जिल्ह्यात गत दहा दिवसांपासून तर कोरोनाने पुन्हा एकदा आकांडतांडव घालण्यास सुरू केला आहे. तीन ते तेरा जानेवारी या दहा दिवसांचा विचार केल्यास, या कालावधीत जिल्ह्यात 98 हजार 194 चाचण्या झाल्यात. त्यापैकी सरासरी 8.73 टक्के अहवाल म्हणजेच नव्याने तब्बल 8,573 बाधित (Active) आढळलेत. म्हणजेच दिवसाला सरासरी 857 बाधितांची यात भर पडली आहे. जी पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत केवळ दैनंदिन दहाहून कमी होती. तर 3 ते 13 जानेवारीदरम्यान दिवसाला 180 प्रमाणे 1800 जण या कालावधीमध्ये कोरोनावर मात केली. गुरुवारला जिल्ह्यात 13 हजार 693 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 15.24 टक्के म्हणजेच 2086 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत.
यामध्ये शहरातील 1589, ग्रामीणमधील 434 व जिल्ह्याबाहेरील 63 जणांचा समावेश आहे. यासोबचत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5.02 लाख 905 वर पोहचली आहे. तर आज ग्रामीणमधून 39, शहरातून 376 व जिल्ह्याबाहेरील 55 असे 470 जण ठणठणीत होऊन आपल्या घरीही परतले. जिल्ह्यातील एका कोरोना असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. 70 वर्षीय पुरुष संवर्गातील हा व्यक्ती कोविडमुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10125 वर गेली आहे. मेडिकल हॉस्पिटल येथे एका इतर कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या कोरोनाच्या नमुना सकारात्मक आढळून आला आहे. यापूर्वी मेडिकलमध्ये मृत झालेल्या अवस्थेत आलेल्या चार रुग्णांनाही कोरोना असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले होते. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झटपट वाढत असताना या मृत्युमुळे पुन्हा चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा आकांडतांडव सुरू आहे. दररोज या आजारातून बरे होणार्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात सातत्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तीन जानेवारी रोजी जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या केवळ 526 इतकी होती. त्यात या दहा दिवसांमध्ये 6,777 रुग्णांची भर पडून ती 7 हजार 303 वर पोहचली आहे. यात 6087 रुग्ण शहरातील, 1170 रुग्ण ग्रामीणमधील तर 46 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. कोरोनामुक्तांचे प्रमाण घटले आहे. अशा परिस्थितीचा सामना करताना आरोग्य प्रशासनही आता अलर्ट झाले आहे.