नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2 मोठे घोटाळ्याचे आरोप करत, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर फडणवीस यांनीही दोषी आढळल्यास कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे. एनआयटीच्या भूखंडावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार आले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत, 2 मोठे आरोप करत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पहिला आरोप आहे, गायरान जमिनीचा 150 कोटींच्या घोटाळ्याचा आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना सत्तार यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचं अवैध वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्ट, आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार गायरान जमीन कोणत्याही खासगी व्यक्तीला विकता येत नाही, किंवा कोणत्याही कामासाठी देता येत नाही.
असं असतानाही मंत्रिपदाचा दुरुपयोग करुन मंत्री अब्दुल सत्तार यांनी जवळच्या व्यक्तीला गोडबाभूळ येथील 37.19 एकर गायरान जमीन देऊन 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.कृषीमंत्री
अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनीतून दीडशे कोटीची जमीन घशात घातली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर अब्दुल सत्तारांवर दुसरा आरोप हा 15 कोटींच्या बेकायदेशीर वसुलीचा करण्यात आला आहे.
सिल्लोडमध्ये 1 ते 5 जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी विभागाला वेठीस धरुन अब्दुल सत्तार यांनी वसुली केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
प्लॅटिनम पावती 25 हजार, डायमंड पावती 15 हजार आणि सिल्व्हर पावती 5 हजार, अशा 3 पावत्या छापण्यात आल्या आहेत. या पावत्यांच्या माध्यमातून त्यांनी 15 कोटींचं टार्गेट असून आतापर्यंत कृषी दुकानदारांकडून 5 कोटी वसूल झाले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
त्याच बरोबर अब्दुल सत्तार यांनी कृषी दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजार वसुलीचं टार्गेटही ठेवले असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
विरोधकांच्या या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, त्या प्रकरणात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे अश्वासनही त्यांनी दिले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांनी तर 15 कोटींच्या टार्गेटपैकी 5 कोटी वसूल झाल्याचा आरोप केला आहे.
अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप तर केला आहेच पण त्याच बरोबर त्यांनी सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार असा टोलाही त्यांनी लगावा आहे.
विधानसभेत अजित पवार, तर विधान परिषदेत अंबादास दानवे आणि अनिल परब सत्तारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
त्यानंतर पुन्हा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्तारांच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी श्रीखंड घ्या हरी भूखंड घ्या अशाही त्यांनी घोषणा दिल्या आहेत.
त्यानंतर विरोधकांनी सत्तारांचा राजीनामा मागितल्यानंतर, टीव्ही नाईनने सत्तारांची बाजू जाणून घेतल्याचा प्रयत्न केला पण सकाळी बोलणार म्हणत सत्तारांनी कॅमेऱ्यासमोर अधिक बोलणं टाळले.
तर सत्तारांबरोबरच विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणाचीही माहिती घेणार, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अजित पवारांनाच इशारा दिला आहे.