नागपूर : नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील (Super Specialty Hospital) डॉक्टरला मध्यप्रदेशातील भामट्यांनी स्वस्तात नवीन लक्झरी कार मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेश राज्यात परिवहन कर (Transport Tax) कमी आहे. तिथून कार खरेदी केल्यास किमान दोन लाखांची बचत होईल, अशी बतावणी करून आरोपींनी डॉक्टरची फसवणूक केली आहे. या प्रकरणातील डॉक्टर धनंजय सेलूकर (Dr. Dhananjay Selukar) हे स्पेशालिटी रुग्णालयात युरोलॉजी विभाग प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची आयूष अग्रवाल आणि पंकज अग्रवाल यांच्यासोबत भेट झाली होती. यावेळी डॉक्टर सेलूकर यांनी नवीन कार घेणार असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा अग्रवाल यांनी महाराष्ट्राऐवजी मध्यप्रदेशमधून कार घेतल्यास आरटीओ नोंदणी कर किमान दोन ते तीन लाख रुपयांनी कमी लागेल, असे सांगितले.
डॉक्टर धनंजय सेलूकर यांनी मध्यप्रदेशमधून कार विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यांनी कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळते केले. मात्र,आरोपींनी केवळ 50 हजार रुपयेचं कार शो-रूममध्ये भरून उर्वरित रक्कम लंपास केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांनी थेट अजनी पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या आरोपीं विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती अजनीचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली.
स्वस्तात नवीन लक्झरी कार देण्याच्या बहाना केला. मध्य प्रदेशातील एका ठगाने नागपुरातील एका डॉक्टरला 11 लाख 12 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉक्टरनं अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये बुकिंग अमाउंट जमा केली. त्यानंतर लवकर कारची डिलिव्हरी मिळेल अशी अपेक्षा डॉक्टरला होती. मात्र, कार मिळण्यास उशीर होत आल्याने त्यांनी कार शोरूममध्ये चौकशी केली. तेव्हा केवळ 50 हजार रुपयेचं बुकिंग अमाउंट जमा झाले असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना स्वतःची फसवणूक झाल्याचं समजलं. त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना सावधता बाळगणे गरजेचे आहे.