यवतमाळ : प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथातील विविध शिल्प विदर्भातील यवतमाळ (Yavatmal) येथे साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध कलावंत भूषण मानेकर (Bhushan Manekar.) यांच्या कला दालनामध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. मानेकर पेंटर यांच्या कुटुंबीयांतील भूषण म्हणजे तिसरी पिढी. आजोबा बालमुकुंद मानेकर, वडील अनिल मानेकर, काका नाना मानेकर यांच्यासह अख्खं मानेकर कुटुंबीय पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळं, शिल्प घडविण्याचे बाळकडू भूषणला बाल वयापासूनच मिळाले. मुंबई येथील जगप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (Sir J. J. School of Art) येथून त्याने शिल्पकला विषयाची पदवी 2021 साली पूर्ण केली. जन्मत: असणाऱ्या कलात्मक गुणांना या पदवीमुळे साद चढला आणि त्याने मोठी झेप घेतली. मुंबई येथील ललित कला केंद्र, सँड आर्ट फेस्टिव्हल, गुलबर्गा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवामध्ये त्याच्या कलेला गौरविण्यात आले आहे.
प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथ साकारण्याचा मान भूषणसह त्याचा सहकाऱ्याला मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील एका कंपनीने हा चित्ररथ तयार करण्याचा कंत्राट घेतले आहे. यामधील शिल्प भूषणच्या कला दालनामध्ये तयार करण्यात आले. दोन दिवसाआधी दिल्ली येथे संपूर्ण संच पोहचला. त्या ठिकाणी या सर्व भागांना एकत्रित (असेम्बलिंग) करण्यात आले. या चित्र रथाची पहिली झलक पहावयास मिळाली. विदर्भातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ येथील कलावंतांना हा चित्ररथ साकारण्याचा मान मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
विदर्भातील यवतमाळ येथे साकारण्यात येणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील जैवविविधता मानके या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश आहे. दर्शनी बाजूस ब्लू मॉरमॉन फुलपाखराची आठ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच, दीड फूट राज्यफुल दर्शविणारे ताम्हण याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी फुलपाखरे यांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर पंधरा फूट भव्य असा शेकरू राज्यप्राणी आणि युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. हे सर्व शिल्प भूषण मानेकर या कलावंत साकारले आहे .