नागपूर : योग बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान आहे. प्राचीन भारतीय योग चिकित्सेला ( Indian Yoga Medicine) संपूर्ण जगाने स्वीकारलंय. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आहे. नागपूर शहरात कस्तुरचंद पार्कवर ( Kasturchand Park) यानिमित्ताने मोठा कार्यक्रम होणार आहे. 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत आहे. आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या झिरो माईल्सच्या (Zero Miles) नागपूरचीही निवड झाली आहे. देशभरात आयुष मंत्रालयामार्फत 75 प्रसिद्ध स्थळांवर योग दिन आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होत आहे. नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं यासाठी पुढाकार घेतला. हा आंतरराष्ट्रीय योग दिन कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या योग दिनाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचा सहभाग राहणार आहे. शिवाय एनएसएस, एनसीसी, पोलीस, योग संस्था, नेहरू युवा केंद्र व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाही सहभागी होणार आहे. सामान्य नागरिकांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.
21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. यावर्षी योग दिवसासाठी योगा फार ह्युमॅनिटी ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी कस्तुरचंद पार्कवर 21 जूनला सकाळी सात पूर्वी पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. योग दिनाचं निमित्त साधून हे आयोजन करण्यात आलं. देशातील 75 ठिकाणांमध्ये नागपूरचा सहभाग राहणार आहे. त्यामुळं नागपूरकरांना या कार्यक्रमात हजेरी लावता येणार आहे.