नागपुरात नवीन वर्षाच्या आनंदावर विरजण पडले आहे. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी (Thirty First parties) आणण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी यासंदर्भातील आदेश काढले. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला. आता पार्ट्यांचं आयोजन केल्यास कारवाई होणार आहे.
नागपुरात आज ओमिक्रॉनचे तीन नवे रुग्ण आढळले. तिघांचीही विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी आहे. तिघेही उपचारासाठी एम्समध्ये दाखल आहेत. एकाच दिवशी ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. तिघांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.
नागपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. 29 डिसेंबर रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा घेण्यात आली. अटी, शर्थींच्या अधीन राहून सर्व दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेस, मॉल, सिनेमा गृह, लग्न, सुरू राहतील.
परंतु, 31 डिसेंबर रोजी सार्वजनिक किंवा खासगी जागेत फार्महाऊस, हाउसिंग सोसायटी, हॉटेल, रेस्टॉरेंट इत्यादी नियोजित वेळेवर सुरू करता येईल. परंतु, डिजे पार्टी, डान्स आयोजित करण्यास बंदी असेल, सार्वजनिक ठिकाणी रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू राहील. असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.