नागपूर : तब्बल दोन महिन्यांच्या सुट्यानंतर आजपासून विदर्भातील शाळांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहूर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, नागपूर मनपाने प्रवेशोत्सव साजरा केला. नागपूर महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षकांनी गुलाब पुष्प वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रवेशोत्सवाचा मुख्य कार्यक्रम देवनगर परिसरातील विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात नागपूर महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, लक्ष्मीनगर झोनच्या शाळा निरीक्षक अश्विनी फेट्टेवार, विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बोबाटे उपस्थित होते.
वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश देण्यात आले. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला. गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
वर्धा जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं शाळांचा परिसर गजबजला. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरु झाल्या. १ हजार ४७९ शाळांमध्ये २ लाखावर विद्यार्थी आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच शाळांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती.
गोंदिया जिल्ह्यातील शाळांना आज सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गोड तोंड करून सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. अनेक शाळांत आज पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना वितरित केले असल्याचे पहावयास मिळते.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्याचे स्वागत गावातील तरुणांनी टाळ वाजवत, फुलांचा वर्षाव करत केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्या पुस्तकांची नवलाई दिसून आली.