नागपूर : एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. पोलिसांनी एका चाळीस वर्षीय जखमी व्यक्तीला मेडिकलमध्ये (Medical) भरती केले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक अठ्ठावीसमध्ये उपचार सुरू झाला. त्याच्या डोक्याला जबर इजा झाली होती. उपचारादरम्यान संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात आले. मेडिकलच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. तो चार जानेवारीला बरा झाला. पण, आपले नाव सांगू शकत नव्हता. त्याला आपला घरचा पत्ता लक्षात येत नव्हता. हा व्यक्ती मूळचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवासी. त्याचे नाव वकील जगन्नाथ साबळे असे आहे. या रुग्णाची देखभाल सेवा फाऊंडेशनव्दारे सुरू होती. डॉक्टरांनीही चांगले उपचार केले. त्यानंतर डॉक्टर व फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्याचा रहिवासी पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. फाउंडेशनच्या सदस्यांनी त्या व्यक्तीचे फोटो समाज माध्यमांच्या ग्रृपवर व्हायरल केले. पाच जानेवारीला या पोस्टला धुळे येथील विनय नावाच्या व्यक्तीने पाहिले.
विनय या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ओळखत होते. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांना माहिती मिळताच वकील यांचे मोठे भाऊ अमृत साबळे यांनी फाउंडेशनचे सदस्य पुरुषोत्तम भोसले यांच्याशी संपर्क साधला. संपर्क झाल्यानंतर सात जानेवारीला अमृत व त्यांचा एक मित्र नागपुरात पोहचले. ते भाऊ वकीलला घेऊन साक्रीला परतलेत. वकील यांच्या कुटुंबात आई, वडील, मोठ्या भावाचे कुटुंब व त्यांच्या दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा पुढील महिन्यात विवाह होणार आहे. वकील साबळे हे दोन महिन्यांपूर्वी अचानक शेतात काम करतानाच कुठेतरी निघून गेला. तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. याची तक्रार कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांकडेही केली.
काही महिन्यांपासून त्यांचा भाऊ वकील साबळे हा असामान्य व्यवहार करीत होता. त्यांचे वागणे हे गतिमंदासारखे झाली होती. परंतु त्याचा कुठेही उपचार केला नाही. ते कुठल्यातरी ट्रेनमध्ये बसून नागपूरला आहे. मेडिकलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांचा पूर्ण परिचय झाला. आता वकील साबळे पूर्णपणे बरे आहेत. कुटुंबीयांशी भेटताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.