नागपूर : नागपुरात बनावट सिगारेट्स आणि नायलॉन मांजा (Manja) जप्त करण्यात आलाय. 17 लाख रुपयांच्या मुद्देमालासह जय रोड लाईन्सच्या एजंटला अटक करण्यात आली. दिल्लीच्या ट्रान्सपोर्टवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एक ट्रक संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात 130 मांजाच्या चक्री आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. सोबतच 200 सिगारेटसचे पाकीट्ही जप्त केले. या सिगारेटसची किंमत 6 लाख, 50 हजार रुपये आहे.
विशेष म्हणजे, सिगारेटस्च्या पाकीटवर कोणत्याही प्रकारचा वैधानिक इशारा लिहिलेला नाही. पोलिसांनी हा 7 लाख, 15 हजारांचा मुद्देमाल तसेच 10 लाख, 50 हजारांचा ट्रक असा एकूण 17 लाख, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकानं लकडगंजमध्ये ही कारवाई केली. एपीआय विलास पाटील, सतीश गवई आणि सहकारी गुरुवारी दुपारी गस्त घालत होते. जय रोड लाईन्सचा एक ट्रक त्यांना संशयास्पद स्थितीत दिसला. मांजाच्या चक्री दिसल्यानं पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला.
नवीन कामठी परिसरात ऑटोमध्ये दोन लाख 30 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी यादवनगर येथील ऑटोचालक श्याम मिरसिंग कटारे याला अटक करण्यात आली. परिमडंळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, एपीआय सुरेश कन्नाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.