नागपूर : मृतक विक्रांत बंडगर आणि आरोपी गणेश बेडेवार हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे (Both have criminal tendencies) आहेत. काल दोघेही एकत्र दारू पित बसले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद (disputes between the two) निर्माण झाला. विक्रांतच्या टोचून बोलण्यावरून संतापलेल्या गणेशने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने विक्रांतच्या गळ्यावर वार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने दगडाने हल्ला चढवला होता. विक्रांत रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी (Kalmana police) घटनास्थळ गाठले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. विक्रांतची हत्या झाल्यानंतर कळमना परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागपूर पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
तपास सुरू होताच पोलिसांनी आरोपी गण्या उर्फ गणेशला तात्काळ अटक केली. आरोपी पोलिसांच्या हाती लागला तेव्हा तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती कळमना ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात नागपुरात एकही हत्या झाली नव्हती. मात्र मार्च महिन्यात पुन्हा हत्यासत्र सुरू झालं. शुल्लक कारणावरून ही हत्या झाली.
गणेश बेडेवार हा ऑटोचालक आहे. तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. मृतक विक्रांत हासुद्धा गुन्हेदारी प्रवृत्तीचाच होता. त्याच्यावरही हल्ला विनयभंग, हल्ला तसेच चोरीचा गुन्हा दाखल होता. दोघेही जयप्रकाशनगरात राहायचे. ओळख असल्याने ते सोबत बसायचे. काल दुपारी गोपालनगरात दोघेही सोबत दारू पित बसले होते. विक्रांतने गणेशला तेरे भांजे का मर्डर हो गया, तुने क्या किया, म्हणून हिनवले. त्यावरून दोघांचा वाद झाला. यात गणेशने विक्रांतला चाकूने भोसकले.